आपापसातील मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाने संघटीत व्हावे

0

एरंडोल । मराठा समाजातील नागरिकांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी पक्षभेद व आपापसात असलेले मतभेद बाजूला ठेवून संघटीत व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिवन प्रेरणा गौरव सन्मान व समाजभूषण पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. शिखर बँकेचे माजी विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. एन.बी.पाटील अध्यक्ष स्थानी होते.

यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने असून सुद्धा केवळ संघटीत नसल्यामुळे समाजाच्या समस्या सुटू शकल्या नाहीत.सर्व समाज बांधव तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येवून संघटीत होणे काळाची गरज आहे. यापुढील काळात संपूर्ण राज्यात संपर्क साधून समाजाला एकत्र करणार असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी मतभेद विसरून एकाच व्यासपिठावर आल्यास सरकारवर दबाव निर्माण होवून समाजाच्या समस्या त्वरित सुटतील असे सांगितले.समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या समाज बांधवांना तसेच गुणवंत विद्यार्थ्याना समाजाने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिखर बँकेचे माजी विभागीय अध्यक्ष एन.बी.पाटील,अर्जुनराव तनपुर, मनोहर पाटील, संजय गांधी समितीच्या सदस्या पल्लवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या तालुका शाखेच्या वतीने श्री.खेडेकर यांना जिवन प्रेरणा गौरव पुरस्कार देवून व शिवप्रतिमा देवून सन्मानित करण्यात आले. तसेच तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवणारी प्रेरणा पाटील व अ‍ॅड. मधुकर देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास यांचा सहभाग
यावेळी समाजातील सहकार महर्षी अ‍ॅड.एन.बी.पाटील, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, पं.स.चे उपसभापती विवेक पाटील, जि.प.चे माजी सदस्य प्रा.एस.पी.पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जाधवराव जगताप, पत्रकार रतिलाल पाटील, युवा उद्योजक समाधान पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, प्रा.मनोज पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, विश्वासराव पाटील यांचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आर.डी.पाटील, पल्लवी पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, भूषण पाटील, प्रमोद सोनवणे यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.