आप्पासाहेब धर्माधिकारींच्या पुढाकाराने डोंगर बहरले

0

राजेश प्रधान – पेण । आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी वृक्ष संवर्धन मोहिमे अंतर्गत प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची संवर्धन मोहीम राबवून सात एकर जागेवर ४९४८ झाडांची लागवड करून उंबर्डे येथील उजाड डोंगरीला वनराईने बहरवली आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेण तालुक्यातील उंबर्डे फाटा येथे वन विभागाच्या सात एकर जागेमध्ये सुमारे पाच हजार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

वृक्षसंवर्धनही करणार
पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीदेखील श्री सदस्यांनी घेतली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक आठवड्यात वृक्षसंवर्धनाचे काम सातत्याने करण्यात येत आहे.

तालुक्यातील ७४८ सदस्यांनी भाग घेत झाडांभोवती वाढलेले गवत काढणे, झाडांना मातीची भर घालणे, सात एकर जागेभोवती चर खोदणे, अंतर्गत साफसफाई करणे आदि कामे केली. पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पाच वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीमुळे उंबर्डे फाटा येथील उजाड डोंगरी आज वनराई ने बहरली आहे.