नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांनी काळा पैसा पांढरा करण्याचे काम केले असून त्यांना कॉलर पकडून तुरुंगात टाकीन, असे कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेनंतर कपिल मिश्रा यांना भोवळ आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवालांवर आरोपांचा भडीमारच केला. मिश्रा यांनी पक्षाच्या बँक खात्याचा 2013-14 मधील तपशीलच जाहीर केला. आप ने निवडणूक आयोगाला पक्षाला मिळालेल्या देणग्यांची चुकीची माहिती दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2014-15 मध्ये आपच्या बँक खात्यात 32 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात आपच्या खात्यात तब्बल 65 कोटी रुपये होते, असा दावा मिश्रा यांनी केला आहे. यादरम्यान बँक खात्यात तब्बल 461 एंट्री या बोगस होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. आप ला बोगस कंपन्यांनी 2 कोटी रुपये दिले असून अरविंद केजरीवाल यांनी या पैशांची माहिती नसल्याचे सांगितले होते. पण हे पैसे केजरीवाल यांच्यासोबत वावरणार्या मंडळींच्या कंपन्यांचे आहेत असे मिश्रा म्हणाले आहेत.
आप च्या दोन आमदारांनी बोगस कंपन्या स्थापन केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. शिवचरण गोयल आणि त्यांच्या पत्नीने असंख्य बोगस कंपन्या स्थापन केल्या असून या माध्यमातून त्यांनी आप ला काळा पैसा पुरवला असा दावा मिश्रांनी केला आहे. या बोगस कंपन्या एका साखळीत काम करत होत्या. या माध्यमातून हवाला मार्फत पक्षाला पैसे दिले जायचे असे त्यांनी स्पष्ट केले. महरौलीमधील आप आमदार नरेश यादव यांनीदेखील बोगस कंपनी स्थापन केली असून त्यांच्या पत्नीने या बोगस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. याच कंपन्यांमधून आप ला देणगीच्या माध्यमातून पैसे मिळाले आहेत असे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषद संपत असतानाच अचानकच कपिल मिश्रा हे भोवळ येऊन बेशुध्द पडले. तसेच कपिल मिश्रा हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर असून आपच्या नेत्यांच्या परदेश यात्रांवरील खर्च जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे.