आभाळ फाटलंय, साथ द्या!; मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

0

मुंबई । राज्यातील शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. सध्या आभाळ फाटल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. पण ती शिवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे सांगत वित्तीय तुट भरून काढून मार्ग काढू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणतांब्यासह परिसरातील 40 गावातील शेतकरी बांधव मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आले होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

चर्चेद्वारे प्रश्न सोडवू
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. राज्याने गेली दोन ते तीन वर्ष सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. आभाळच फाटलंय त्यातून खचून न जाता ते शिवण्याचे काम राज्य शासनाने सुरू केले आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य शासन तयार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक वेळी आंदोलनाची गरज नाही
तीन वर्षांच्या काळात शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र या काळात आम्ही डगमगलो नाही. त्याला मोठ्या धैर्याने सामोरे गेलो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सरकारने राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणार्‍यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असे केलेले नाही, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. यापुढेही समस्या कायम राहतील. पण त्यावर पर्याय शोधत राहू. प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चेचे नेहमीच मार्ग निघतो आणि आमचे सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्ज भरणार्‍यांना 50 हजार सवलत द्या
शेतकर्‍यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित भूमिका घेतली होती. या आंदोलनात सर्वांनी मेहनत केली. याच मेहनतीचे फळ म्हणून सरकारने ही कर्जमाफी केली. आमचा आणि सुकाणू समिती शेतकर्‍यांसाठीच काम करतेय. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय व्हावेत हीच आमची इच्छा आहे. पुढचे धोरण आम्ही लवकरच ठरवू, असे पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी यावेळी सांगितले. नियमित कर्ज भरणार्‍यांना 50 हजारापर्यंत सवलत द्या, अशी मागणी देखील यावेळी शेतकर्‍यांनी केली.

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविणार
गेल्या पंधरा वर्षांत शेती क्षेत्राची खूपच वाईट परिस्थिती झाली, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष टीका करत कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले, शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला आहे. राज्य शासनामार्फत शेती व शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतीला शाश्वत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून राज्य शासन सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढत आहे. पुणतांब्याच्या शेतकर्‍यांचे मी आभार मानतो. शेतकरी खर्‍या अर्थाने कर्जमुक्त होणे हे अंतिम ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.