आभिरानी व लग्न सोहळा पुस्तकांचे प्रकाशन

0

एरंडोल । येथील प्रसिद्ध अहिराणी कवीयत्री श्रीमती शकुंतला पाटील रोटवदकर यांनी लिहिलेल्या अभिरानी व लग्न सोहळा या पुस्तकांचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव,शोभना साळी व पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सरलाबाई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आशाताई परदेशी अध्यक्षस्थानी होत्या. तर पालिकेतील सर्व नगरसेविका प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला
अहिरराव यांनी लग्नसोहळा हे पुस्तक आजच्या आणि उद्याच्या भावी पिढीसाठी अनमोल भेट असल्याचे सांगितले.

चौथीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश
समाज, संस्कृती, परंपरा, चाली -रिती जोपासण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. पुस्तकात खान्देश बोलीभाषा, अहिराणी शब्दांचे सौंदर्य, जात्यावरील ओव्या, लग्नाची गाणी, कानबाई, गौराईची गाणी तसेच म्हणी व उखाणे यांचा विपुल खजिना असल्याचे सांगितले. जेष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी यांनी अभिरानी हे पुस्तक आहिराणी भाषेला नवरूप देणारे व आहिराणी भाषेची श्रीमंती वाढविणारे आहे. कवयत्री शकुंतला पाटील यांचे आहिराणी भाषेवरील प्रेम सिद्ध करणारे आहे. 2014 मध्ये इयत्ता चौथीच्या वर्गातील नवीन अभ्यासक्रमाच्या बालभारती पाठ्यपुस्तकात आहीराणी बोली भाषेतील मन्हा खान्देसनी माटी या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.तसेच 2017 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शकुंतला पाटील यांनी सादर केलेल्या आहिराणी कवितेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही पुस्तकांना वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शोभा साळी,नगरसेविका सरलाबाई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लेखिका शकुंतला पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्षमा साळी यांनी सुत्रसंचलन केले तर मनीषा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेविका जयश्री पाटील, आरती महाजन, हर्षाली महाजन, वर्षा शिंदे, प्रतिभा पाटील, दर्शना ठाकुर, सुरेखा चौधरी यांचेसह महिला मोठ्या संख्येन उपस्थित होत्या.