पुणे । तेव्हा सारे काही देशासाठी ही भावना होती, देशभक्तीची आस आणि स्वातंत्र्याचा ध्यास बाळगून तरुण-तरुणी स्वातंत्र्य लढ्यात झोकून देत कार्य करत, या आठवणींना उजाळा देताना ‘त्यांचे’ चेहरे खुलले आणि हा आमचा नव्हे स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असलेल्या सर्व बंधू-भगिनींचा सन्मान आहे. अशा शब्दांत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते; पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त 25 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी वयाची 70-80 ओलांडलेल्या या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी शंकरदत्त महाशब्दे, आबा बागुल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, अमित बागुल, टी.एस. पवार आदी उपस्थित होते. यावेळी गोवा मुक्ती, दादरा-हवेली आणि स्वातंत्र्यलढ्यातील मंगला दास्ताने, विमलताई गरुड, सिंधू काटे, सुमन दीक्षित, यमुना साळुंखे, मंगला ओनामे, मालती धुमाळ, पद्मा कोद्रे, हिराबाई काळोखे, हिराबाई राजगुरू, वसंतराव प्रसादे, विठ्ठल महाजन, भोगीलाल शहा, वामन करंदीकर, शिवाजीराव गोपाळे, मधुसूदन खानविलकर, जनार्दन तांबे, अरविंद मनोरकर, बाळासाहेब जांभुळकर, डॉ. शंकरराव परांजपे, हुतात्मा नारायण दाभाडे यांचे चिरंजीव या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रातिनिधिक भाष्य करताना दास्ताने, प्रसादे यांनी किमान 15 ऑगस्ट हा दिवस देशासाठी सर्वांनी द्यावा, राष्ट्रध्वजाला वंदन करावे आणि स्वातंत्र्यदिनी पिकनिक या मनोवृत्तीला हद्दपार करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सैनिकांच्या त्यागाचे मोल अधिक…
ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आबा बागुल यांचे कदम यांनी कौतुक केले. बागुल म्हणाले, शौर्याचा, धैर्याचा आणि शक्तीचा हा सन्मान आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे मोल आणि त्यांच्या देशप्रेमातून प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.