आमचा हक्काचा निवारा हिरावून घेऊ नका!

0

पिंपरी-चिंचवड : आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाविरोधात विविध मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. सभा, मोर्चा, चिंतन पदयात्रा, लाक्षणिक उपोषण, मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवा, अशा विविध माध्यमातून रिंगरोड बाधितांनी आपली भूमिका मांडली आहे. या आंदोलनांवेळी महापालिका व प्राधिकरण प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी नागरिकांना विविध आश्‍वासने दिली आहेत. या आश्‍वासनांचे पुन्हा एकदा स्मरण करून देण्यासाठी रिंगरोड बाधितांनी शुक्रवारी ‘स्मरण पदयात्रा’ काढून प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. या पदयात्रेत नागरिक, लहान मुले व महिलांची मोठी उपस्थिती होती. आमचा हक्काचा निवारा हिरावून घेऊ नका, अशी मागणी पुन्हा एकदा नागरिकांनी केली. पदयात्रेनंतर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांना निवेदन देण्यात आले.

वाल्हेकरवाडीतून पदयात्रेला सुरुवात
स्मरण पदयात्रेला शुक्रवारी सकाळी वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकापासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे, या पदयात्रेत लहान मुले व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेने प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मारली. तेथे स्मरण पदयात्रेची सांगता झाली. प्राधिकरण व महापालिका प्रशासनाने प्रस्ताविक रिंगरोड रद्द करावा, गोरगरीब नागरिकांची हक्काची घरे वाचवावीत, जुना कालबाह्य झालेला विकास आराखडा रद्द करावा, अशा मागण्या यावेळी केल्या.

चिमुकल्यांच्या फलकांनी वेधले लक्ष
स्मरण पदयात्रेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी आपल्या हातात विविध मजकुरांचे फलक घेतले होते. या फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ‘काका आमचा निवारा तोडू नका, आम्हाला उघड्यावर आणू नका‘, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब आमचे घर पाडू नका’, ‘हिरावून घेऊ नका आमची घरे’, असे मजकूर लिहिलेले फलक लहान मुलांनी हातामध्ये घेतले होते.