बारामती । बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक या ग्रामपंचायतीतील उपोषणाचा आज तिसावा दिवस आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पंचायत समिती या उपोषणाकडे दुर्लक्षच करीत आहे. आणि त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे उपोषणकर्त्यांनीच बारामती तालुका दंडाधिकार्याना साक्ष ठेवून दोन प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. या प्रतिज्ञापत्रात आमची चूक असेल तर आमच्यावरती गुन्हे दाखल करावेत तसेच आम्ही दिलेली माहिती खोटी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी असे प्रतिज्ञापत्र सतिश महादेव गावडे व पोपट विठोबा धवडे यांनी केल्यामुळे बारामती पंचायत समिती प्रशासन अडचणीत सापडले आहे.
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार
मूल्यांकनापेक्षा ज्यादा खर्च करून अपहार करणे, लेखापरिक्षण अहवाल वर्षात तीन टक्के अपंगांसाठी खर्च न करणे, पंधरा टक्के मागासवर्गीय समाजातील लोकांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवणे, ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता दिल्याचे दाखवून अपहार करणे, ग्रामनिधी व पाणीपुरवठा योजनेतून बोगस टीसीएलवर खर्च करणे, दरपत्रके न घेताच बोगस दरपत्रके घेऊन त्यावर खोट्या सह्या करून खर्च करणे, इत्यादी अनेक बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हापरिषदेने याची गंभीर दखल घेण्यात यावी. अशी आमची स्पष्ट मागणी असताना केवळ विस्तार अधिकारी इथल्या इथे उत्तरे का देत आहे? असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे.
अनेकांचा पाठिंबा
याबाबत पंचायत समिती प्रशासन महत्त्वाचे मुद्दे सोडून भलत्याच स्पष्टीकरणाकडे का वळत आहेत? हे ही स्पष्ट होणे गरजेचे आहे. उपोषणकर्त्यास अॅड. शेखर यशवंत दाते, अॅड. गुलाबराव बाजीराव गावडे, अॅड. आकाश विजयराव मोरे, अॅड. ज्ञानदेव शिंगाडे, अॅड. शामसुंदर पोटे, अॅड. अजित जगन्नाथ कोकरे, अॅड. राजकिरण शिंदे संपतराव टकले यांनी पाठिंबा दिला आहे.
चक्रीय उपोषणाचा 26 दिवस
चक्रीय उपोषणानंतरसुद्धा गेली सव्वीस दिवस झाले न्याय मिळालेला नाही त्याउलट पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी तोंडी चर्चा करताना सांगितले की, तुम्हाला माहिती दिली आहे उपोषण मागे घ्या नाहीतर पोलिस स्टेशनला याबाबत कळविले आहे. तुम्हाला अटक होण्याची शंका आहे. अशा प्रकारे भिती घालून माझे उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त करीत आहेत. मी जनहितासाठी काम करीत आहे. मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी अमरण उपोषण चालू असताना मला व माझे कुटुंबातील व्यक्तींना तसेच माझ्या सोबतच्या उपोषणकर्त्यासह त्यास सहकार्य करणार्या व्यक्तीस धोका निर्माण झाल्यास पंचायत समिती बारामती, जिल्हा परिषद पुणे यांस जबाबदार धरण्यात यावे यामध्ये पोलिस प्रशासनाच्यावतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्यावेळेपासून पाणीसुद्धा वर्ज्य करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे बारामती तालुक्यातील बर्याच ग्रामपंचायतींचा गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रशासनाने कारवाई टाळल्याचे बोलले जात आहे. उपोषणकर्ते प्रतिज्ञापत्राव्दारे एवढी स्पष्टता करीत असताना बारामती पंचायत समिती प्रशासन केवळ कागदी घोडेच का नाचवित आहेत.
अमरण उपोषणाचा निर्णय
पया प्रतिज्ञापत्रात जिल्हापरिषदेने या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व लेखापरिक्षण पूर्ततेची पडताळणी करणारे विस्तार अधिकारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून गटविकास अधिकारी यांचेविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपल्या अभिप्रायासह अहवाल दाखल करावा तसेच मला पाच दिवसात लेखी उत्तर न दिल्यास मला अमरण उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय नाही. सध्या ज्या मंडपात चक्रीय उपोषण सूरू आहे त्याच मंडपात अमरण उपोषण सुरू करणार आहे असा स्पष्ट इशारा सतिश महादेव गावडे यांनी दिला आहे. पंचायत समिती प्रशासन बजेटबाहेर गंभीर बाबी व खर्चाबाबत दिशाभूल करणारी माहिती देत आहे. यामुळे उव्दिग्न होऊन गावडे यांनी अमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.