आमची थट्टा करुन प्रशासन उपोषणकर्त्यांच्या मरणाची वाट बघतेय का ?

0

शिंदखेडा :- पाटण येथील घरकुल व शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून संंबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी 16 मार्च पासून पं.स.समोर 7 जणांचे उपोषण सुरु आहे. गटविकास अधिकारी यांनी सुरुवातीला पाच दिवसात चौकशी करुन अहवाल देवू असे सांगितले होते. पाच दिवस पूर्ण झाल्यावर गटविकास अधिकार्‍यांनी पुन्हा घुमजाव करत दहा दिवसात अहवाल देण्याचे उत्तर दिल्याने शनिवारी उपोषणकर्ते चांगलेच संतप्त झाले. आमची थट्टा करीत असून उपोषणकर्त्यांची मरणाची वाट पहात असल्याचा सवालही यावेळी उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

पाटण येथील उपोषणाला आठवडा उलटल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून वजन 5 किलोपर्यंत घटले आहे. जोपर्यंत संबधीतावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्ते यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांना सांगितले आहे. नवीन चौकशी समितीला अद्याप संबंधित ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी दप्तर उपलब्ध करून न दिल्याची माहिती मिळाली असून याबाबत ग्रा प विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी दुजोरा दिला.

तक्रार असलेल्या सरपंचांसोबत फिरतेय चौकशी समिती
जर आम्ही येथून उठलो की आमचे उपोषण सुटेल. तुम्हाला काय चौकशी करायची आहे ती करा आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. तसेच ज्या सरपंचा विरोधात तक्रार आहे त्यानांच चौकशी समिती सोबत घेऊन फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान या अगोदर गटविकास अधिकारी यांनी उपोषण कर्त्याना लेखी पत्र दिले होते की, समितीचा अहवाल 5 दिवसात आम्हीं आपणास देऊ आपण उपोषण मागे घ्यावे असे नमूद केले होते मात्र आज त्या घटनेला 5 दिवस पूर्ण झाल्यावर त्यांना त्याच पद्धतीने लेखी पत्र दिले मात्र अहवाल 10 दिवसात देऊ असे म्हटल्याने उपोषण कर्ते या मुळे संतप्त झाले व आमची तुम्ही थट्टा करून मरणाची वाट बघत आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
दरम्यान उपोषणाचा सातवा दिवस असून उपोषण कर्त्यांच्या वजनात दररोज घट होत आहे. यात पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पवार यांचे वजन 5 किलो कमी झाले आहे, विद्यमान उपसरपंच जयेंद्र पवार यांचे 9 किलो, माजी सरपंच घनश्याम पवार 3.30 किलो, करण सिंग गिरासे यांचे 5. 50किलो, तुषार वाघ 3 किलो, गंगाराम माळी 8 किलो, चंद्रकांत पवार 4.50 किलो ने कमी झाले आहे.