कोकणातले एक खेडगाव पालगड त्याचे नाव पालगडला अभिमान वाटावा, कोकणाची मान ताठ व्हावी आणि अवघ्या महाराष्ट्राने धन्य व्हावे, असे भाग्य सान्यांच्या कुळाला लाभले. 1899 सालातील डिसेंबरची 24 तारीख होती. यशोदाबाईच्या कुशीत सगुण बाळरुपात क्रांतीच अवतरली होती… आणि योगायोग असा की, हाच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस प्रेमाकरिता, दिन-दलितांच्या उद्धाराकरीता त्या प्रभूने रक्त सांडले आणि त्याच पावन दिवसाचा पहिला श्वास घेऊन जन्म पावलेला पंढरी देखील महाराष्ट्राचा लाडका, प्रेमळ, ‘श्याम’ बनला. दीन-दलितांचा कैवार घेऊन उभा राहिला. त्यांच्याकरिता प्राण फेकण्यास सिद्ध झाला…
भाऊराव साने हे वडवलीचे खोत गावाचा शेतसारा वसूल करून तो सरकारकडे भरायचा हे खोताचे काम. एकेकाळी साने घराणे श्रीमंत म्हणून प्रसिद्ध होते. पण पुढे दैवगति पालटली… भाऊरावांचे नाव सदाशिव म्हणून पंढरीचे पूर्ण नाव पांडूरंग सदाशिव साने असे होते. श्याम लहानपणापासून अतिशय हुशार. श्यामला इतरांना मदत करायला आवडत असे. त्याने फुलांचे हृदय जाणले. मुलांचे मन रंगवले. आजाप्यांची सेवा केली. विद्यार्थ्यांची भूक भागवली, मायबहिणींना आधार दिला, किसान कामगारांचा कैवार घेतला, झाडूने सफाई केली, लेखनीने क्रांती केली, पण ही सारी देणगी कुणाची? श्याम म्हणता, ‘आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु! तिनेच मला प्रेमळपणे बोलावयास व बघावयास शिकविले. मनुष्यावरच नव्हे, तर गाईगुरांवर, फुलापाखरांवर, झाड्यामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले…’ श्यामला महाराष्ट्राची माऊली बनविणारी त्यांच्या हृदयात अपार प्रेम निर्मिणारी ही थोर आहे. म्हणजेच यशोदाबाई म्हणजे वात्सल्याची प्रतिमाच. प्रेमाची गंगाच त्यांना ‘बयो’ ही म्हणत हीच श्यामची गुरु आणि कल्पतरु! लहान लहान गोष्टीतून, छोठ्या मोठ्या प्रसंगातून याच माऊलीने आपल्या पंढरीला सर्वाभूती देव पाहण्याची, प्रेम करण्याची, मंगल शिकवणूक दिली…
आईच्या प्रेमळ शिकवणुकीतून व संतचरित्राच्या वाचन मनातूनच पंढरीचे हृदय भक्तिमय बनलेच होते. भक्तीच्या पाण्यातच सेवेचे कमळ फुलावयाचे, त्याप्रमाणे पंढरी सेवामुर्ती झाला होता. पुण्याला रामच्या घरी शिकत असतांना त्याने रामच्या आजारी बहिणीची खूप सेवा-शुश्रूषा केली. दररोज एखादे तरी सत्कृत्य करण्याचा नियम पंढरीने केला. भाजीची टोपली घेऊन येणार्या मायबहिणींना ओझे उचलायला तो मदत करू लागला. पुण्यातील साक्षर-निरक्षरांच्या खाने-सुमारीत त्याने स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविले. (एन्फ्ल्युएन्झाच्या) साथीत देखील सेवेचे काम पत्करले.पालगडहून निघाला तो पुण्याला मित्राकडे-रामकडे आला. नूतन मराठीत नाव घातले. जेवणाचे हाल चालले होते. डाळे चुरमुरे खाऊन दिवस काढी, रामच्या आईने चार वार लावून दिले. बाकीच्या दिवशी उपवास. तिकडे आई देखील कष्टात दिवस काढीत होती. स्वाभिमानाने जगणे कठीण झाले होते. ती खूपच खंगली आजारी पडली. एके रात्री पंढरीला स्वप्नात आजारी आई दिसली. त्याने कशीतरी पैशाची जमवाजमव केली. निघाला आईच्या भेटीसाठी पण हर्णे बंदरारच मावशी भेटली. ती रडू लागली. म्हणाली, ‘पंढरी, तुझी आई देवाघरी गेली…’ पंढरीवर आकाशच कोसळले. त्याच्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झाला. पण विवेकाने शोक आवरणे भागच होते. याच सुमारास पंढरी मॅट्रिकमध्ये गेला. अभ्यास करून पास झाला. न्यू पूना कॉलेजमध्ये त्याने प्रवेश केला. एक हुशार व नम्र विद्यार्थी म्हणून तो प्रसिद्ध झाला. 1924 साली पंढरी तत्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाला. यावेळी तो अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात दाखल झाला होता.
अमळनेरच्या शाळेतील मुलांच्या जीवनाला आकार देत असतांनाच 1930 साल उजाडले. महात्मा गांधींनी देशाला हाक दिली. मिठाची सत्याग्रह पुकारला. राष्ट्रात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. गुरुजी का स्वस्थ बसणार! त्यांनी शाळेच्या छोट्या जगाचा निरोप घेतला आणि देशाच्या लढ्यात उडी घेतली. 1946 साल होते ते एक दिवशी वृत्तपत्रातून महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी वाचायला मिळाली, ‘पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला म्हणून साने गुरुजींचे प्राणांतिक उपोषण!’ दिवसांमागून दिवस चालले. प्रचार, अर्ज, विनंत्या यांची धमाल उडाली. गुरुजींचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील नेते धावले आणि 10 मे 1946 रोजी मंदिराच्या विश्वस्तांनी आपली संमति दिली. गुरुजींनी आपले दिव्य परत घेतले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात घडलेली ही फार मोठी क्रांती आहे. गुरुजी आणि गोष्ट ह्या गोष्टी महाराष्ट्रातील मुलांपुरत्या तरी एकरुप झाल्या. परंतु 11 जून 1950 चा तो दिवस पहाटेच गुरजी हे जग सोडून गेले. सर्वत्र अंधार माजला. महाराष्ट्राला आपली वत्सल माता गेल्याचे दु:ख झाले. स्त्री-पुरुष, बाळ-गोपाळ सारे हळहळले… विनोबा म्हणाले, ‘अमृताचा पुत्र ही त्यांची पदवी तुकारामादिकांच्य मालिकेत मी त्यांची नि:शंक गणना करतो.’
गुरुजी देहाने या जगातून गेले, पण त्यांचे कार्य आणि वाड्:मय पिढ्यान पिढ्यांना स्फूर्ति द्यायला मागे आहे. गुरुजींच महान स्मृतीला माझे कोटी कोटी वंदन, प्रणाम!
किरण विठ्ठल पाटील
शिक्षक, भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव
मो. 9270860296