मुंबई: एकीकडे भाजपा सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहो असे सांगत आहे. राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू झाल्यानंतर आमचेच सरकार येणार असे कोणत्या तोंडाने सांगत आहे?असा प्रश्न शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यात नवी समीकरणं जुळून येत असल्यानं अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. आपण महाराष्ट्राचे मालक आणि देशाचे बाप आहोत असं कुणाला वाटत असेल तर त्या खुळ्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. उद्धव यांनी भाजपला ‘१०५’ वाले म्हणून हिणवलं आहे. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआडून घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे आता उघड झाले आहेत, असा थेट आरोप उद्धव यांनी केला आहे.
राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते ‘पंच’ फुटल्यावर पराभवाच्या टोकास गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. ‘पुन्हा आमचे सरकार’ हा आत्मविश्वास त्यातूनच जागा झाला असेल. पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. जनता ती तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव यांनी म्हटले आहे.