‘आमच्या बापाचा फोन’ विनोदी नाटीकेने जिंकली रसिकांची मने

0

स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमी दिन उत्साहात ; ‘त्या श्रावणसरी’ एकांकिकेचेही अभिवाचन

भुसावळ:- जागतिक रंगभूमी दिनानिमित्त स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे सेंट मेरी स्कूलच्या प्रांगणात नाट्य अभिवाचन आणि एका विनोदी नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. ‘आमच्या बापाचा फोन’ या विनोदी नाटीकेने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाला उपस्थित भुसावळ शहरातील मान्यवर रंगकर्मी अनिल कोष्टी, रमाकांत भालेराव, संजय तारांबळे, श्रीकांत जोशी यांच्या हस्ते नटराजपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रेम आकर्षण नाही तर आत्मीक मिलन
विरेंद्र पाटील लिखीत ‘त्या श्रावणसरी’ या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. या अभिवाचनात संजीवनी यावलकर, प्रा.गिरीष कुलकर्णी आणि मानसी पाटील यांनी सहभाग घेतला. प्रेम माणसाला बळ देते, खरं प्रेम त्यागातही तग धरतं, प्रेम म्हणजे निव्वळ शारिरिक आकर्षण नाही तर प्रेम म्हणजे आत्मीक मिलन असतं असा मध्यवर्ती आशय असलेल्या ‘त्या श्रावणसरी’ या एकांकिकेच्या अभिवाचनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. संजीवनी यावलकर, प्रा. गिरीष कुलकर्णी आणि मानसी पाटील यांचा उत्तम वाचिक अभिनय, लयबध्द संवाद आणि उत्कट भावनांचे भावस्पर्शी अभिवाचन रसिकांना एक वेगळीच अनुभूती देऊन गेले. समृध्दी पाटील हिचे संगीत संयोजन आणि आदित्य पाटील याच्या प्रकाश योजनेने अभिवाचनातील भाव अधिकच गहिरे केले.त्यानंतर तुषार जोशी आणि आदर्श पांड्या यांनी सादर केलेली विनोदी नाटीका “ आमच्या बापाचा फोन ” रसिकांचे निखळ मनोरंजन करुन गेली. आदर्श पांड्या यांनी बापाची भूमिका आपल्या कायिक अभिनय आणि देहबोलीतून उत्तम साकारली. तुषार जोशी याने मुलाची भुमिका साकारत धमाल आणली. लेखक विरेंद्र पाटील यांनी ‘आमच्या बापाचा फोन’ या विनोदी नाटकातून बाप आणि मुलाचं आधुनिक नातं नर्मविनोदी शैलीत उत्तम मांडलं. नाटकाचे बोधचिन्ह असलेल्या दोन मुखवट्यांच्या ‘आसू’ आणि ‘हसू’ या भावना या दोघंही सादरीकरणातून प्रेक्षकांनी एकाच रंगमंचावर अनुभवल्या हे या कार्यक्रमाचं वैशिष्टयं म्हणावं लागेल.

यांनी घेतले परीश्रम
सुत्रसंचालन संजीवनी यावलकर यांनी केलं तर आभार सुमित पाचपांडे याने मांडलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण माळी, विश्‍वजीत घुले, मुकेश खपली, रोहन माळी, धनराज कुंवर, हरीष कोळी, राजेश पाटील, उमेश चौधरी, अक्षय परदेशी, रोशनी परदेशी, खुशाल निंबाळे आदींनी परीश्रम घेतले.