आमच्या बाळाचे नाव आधिच ठरले आहे : सानिया मिर्झा

0

पणजी । आम्हाला मूल झाले तर त्याचं नाव ‘मिर्झा-मलिक’ असेल, माझे आणि नवर्‍याचे याबाबतीत एकमत झाले आहे. शोएबला छानशी मुलगी हवी आहे, असे टेनिसपटू सानिया मिर्झाने सांगितले. गोव्यातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित ‘गोवा फेस्टमधील नॉलेज सीरिज’मध्ये सानिया बोलत होती. यावेळी सानियाने आपला जीवनप्रवास उलगडून सांगितला.यावेळी सानिया म्हणाली, आम्ही दोघी बहिणी असताना देखील आमच्या आई वडीलांना कधीच एखादा मुलगा असावा, असे वाटले नाही. त्यांनी आम्हाला मुलांसारखं वागवले. आम्हालाही कधी एखादा भाऊ असावा, असे वाटले नाही. वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस रॅकेट हाती घेऊन स्ट्रगल करत पुढे गेले. त्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले, असे सानिया म्हणाली.

आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्व दिले जात असले तरी, अलिकडच्या काळात चित्र बदलले आहे. आता इतर खेळांनादेखील महत्व मिळू लागले, असं सानियाने नमूद केलं.आज महिला क्रीडापटूंनीदेखील आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवली आहे. आज 10 ते 12 नावं महिला क्रीडा विश्‍वात आदराने घेतली जातात, असं सानियाने सांगितलं.देशात आज क्रीडा वाहिन्या वाढत आहेत. वर्तमानपत्रांमध्येही क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांबद्दल येणारे कव्हरेज वाढत असल्याबद्दल सानियाने समाधान व्यक्त केले.