आमडदे बँकेतील तीन कोटींच्या दागिण्यांची चोरी : तिघा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

भडगाव : तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बँकेच्या शिपायासह अन्य दोघांनी मिळून सुमारे तीन कोटींच्या दागिण्यांची चोरी केली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना भडगाव न्यायालयातन पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तीन कोटींच्या दागिणे चोरीमुळे उडाली होती खळबळ
भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत कर्मचारी व त्याचे दोन साथीदार यांनी बँकेत मोठा डल्ला मारत बँकेच्या तिजोरीत दोन चौकोनी स्टील डब्यात ठेवलेल्या 3 किलो 655 ग्रॅम वजनाचे सोने व सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून तीन कोटी 17 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केला होता. तपासाअंती या चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याचे अन्य दोन साथीदार विजय नामदेव पाटील, बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील (आमडदे) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींकडून लपवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
अटकेतील तिघा आरोपींना भडगाव न्यायालयात तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी न्या.ईश्वर जे.ठाकरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता आरोपींना 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.व्ही.डी.मोतीवाले यांनी बाजू मांडली.