आमदारमहोदय, हे वागणं बरं नव्हे

10

मुंबई | वाहतूक नियंत्रणावर आधीच हैराण असलेल्या पोलिसांना आमदार असल्याच्या विशेषाविर्भावात दाखविलेली ढोस कामी न आल्याने ‘ईगो’ दुखावलेल्या दापोलीतील राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी विधानभवनासमोरच अर्धा तास तमाशा केला. ऐन चाकरमान्यांच्या घाईच्या वेळेत आमदार संजय कदम यांनी रस्त्यात फतकल मारल्याने शेकडो वाहने खोळंबली व सामान्य मुंबईकरांची गैरसोय झाली. या आमदाराला आमची वाट अडविण्याचा हक्क दिला कुणी, अशा संतप्त भावना यावेळी चाकरमान्यांनी व्यक्त केल्या. सार्वजनिक वाहतुकीला वेठीस धरून खोळंबा करण्याचा गुन्हा या आमदारावर दाखल व्हावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली. त्यांची एखाद्या वाहतूक पोलिसाच्या वागणुकीबाबत तक्रार असेल तर ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे नोंदवायला हवी होती, असा सूर वेठीस धरलेल्या जनतेतून व्यक्त झाला.

आमदार कदम यांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक खोळंबा होत असल्याने त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यास सांगितले. मात्र रमेश चौधरी या पोलिसाने आपली मूळ कर्तव्याची जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी भररस्त्यात ठिय्या आंदोलन सुरु केले. मात्र, यामुळे अर्धा तास नाहक वाहतूक खोळंबा होऊन पोलिसांची तारांबळ उडाली. या प्रतिष्ठा दुखावल्या गेलेल्या आमदाराची समजूत काढण्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा मागवावा लागला.

‘आम्ही इकडून येत होतो, अधिवेशनाला चाललो होतो. रमेश चौधरी या पोलिसाला सांगितले गाड्या वगैरे अंगावर येत आहेत, जरा लक्ष दे, तर त्याने झाडाखाली आमची ड्युटी आहे, असे सांगितले.’
– संजय कदम, आमदार, दापोली

कदमसाहेब, आम्हाला रोजचेच
“अहो कदमसाहेब, एक दिवस अधिवेशनाला आलात तर रस्त्यावरची वाहने तुमच्या अंगावर आली. तुम्हाला लक्ष द्यायला, मदतीला, या वाहतुकीतून मार्ग काढायला एक पोलीस तैनात हवा. मग आम्हाला तर हे रोजचेच. आमच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून विधानसभेत आवाज उठावाल का?” असा सवाल आमदारामुळे अर्धा तास खोळंबून राहिलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांनी केला. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आमदार संजय कदम यांनी नाहक प्रतिष्ठेचा प्रश्न करून व नंतर चॅनेल्सवाल्यांचे कॅमेरे पाहून चेव चढल्याने हा मुद्दा ताणून धरला. आधीच घाईच्या वेळेत वाहतुकीला नियंत्रित करण्यात व्यस्त असलेल्या पोलिसांना हा अतिरिक्त ताण झाला.

नेहमीच सरकारी कामात अडथळा
संजय कदम हे नेहमीच आपली ढोस जमविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी खेड तहसील कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदम यांच्याविरोधात तक्रार केली होती. सरकारी कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरणात कदम यांना 2015 मध्ये दोषी धरण्यात आले होते. खेड सत्र न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावली होती.

भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी म्हणून आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यानाच पत्र लिहले होते. त्यामुळे ज्यांच्यावर भ्रष्टाचार केलाचा आरोप आहे तेच आता चौकशीची मागणी करत असल्याची स्टंटबाजीही समोर आली होती. दापोली, मंडणगड, खेड या तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात 10 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मंत्री कदम यांनी केला होता. एकूणच राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यात माहीर आहेत. विधानसभा सभाग्रहात काही अजून त्यांनी जनहिताचे विशेष प्रश्न उचलून धरलेले चर्चेत आलेले नाहीत.