आमदारांकडून मंजूर कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंची पुन्हा टिका
शेतीला वरदान ठरणार्या कुंड धरणाच्या कामाला सुरूवात
मुक्ताईनगर : कुंड धरणाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परीसरातील शेतकर्यांच्या विहिरींना बारमाही पाणी राहणार असून भविष्यात बंद पाईप लाईनद्वारे शेतीला पाणी देण्यात येईल व यातून परीसरात समृद्धी येण्यास मदत होईल मात्र स्थानिक आमदार हे मंजुर विकासकामांमध्ये खोडा घालत असून मंजूर कामांना ब्रेक लावण्याचे काम करीत आहेत, असा आरोप माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. शेतीला वरदान ठरणार्या जोंधनखेडा येथील गोरक्ष गंगा नदीवरील कुंड धरणाच्या मातीच्या भिंतीची उंची वाढवणे आणि सांडव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या कामाचा शनिवार, 5 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने तर प्रत्यक्ष धरणस्थळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते झाला. यावेळी खडसे बोलत होते.
बाळ आम्ही जन्माला घालतो मात्र बारसे करताय दुसरे
माजी मंत्री खडसे म्हणाले की, आपण विकास निधी आणण्यासाठी समर्थ आहोत कोणाला जर स्पर्धा करायची असेल तर विकास कामांशी स्पर्धा करावी मात्र आपण विकास कामांसाठी पाठपुरावा करतो व ते मंजूर झाले की इतर श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. बाळ आम्ही जन्माला घालतो आणि बारसे करण्यासाठी दुसरे पुढे येतात, अशी टिका त्यांनी विरोधकांवर टीका केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर, पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, वनिता गवळे, वैशाली तायडे, रामदास पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, यु.डी.पाटील, पवनराजे पाटील, विशाल महाराज खोले, डॉ.बी.सी.महाजन, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, विलास धायडे, रामभाऊ पाटील, रंजना कांडेलकर, राजेश ढोले, नंदकिशोर हिरोळे उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नितीन कांडेलकर यांनी मान्यवरांच्या हस्ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मागणीची जलसंपदा मंत्र्यांकडून दखल : अॅड.खडसे
अॅड.रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या की, 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे आपल्या परीसरातील सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती व त्यांनी तत्काळ एका आठवड्यात ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा प्रश्न मार्गी लावला तसेच 15 दिवसात जोंधनखेडा धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी 30 कोटी 84 लक्ष निधी मंजूर केला होता. आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत आहे हे काम पूणर्ण झाल्यावर धरणाची साठवण क्षमता वाढेल याचा परीसरातील शेतकरी बांधवांना लाभ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्र्यांनी केली हनिधीची मागणी : मंत्री पाटील
ऑनलाईन प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले की, गत फेब्रुवारी महिन्यात परीवार संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली व त्यानंतर जळगाव येथे सर्व प्रकल्पाची आढावा बैठक घेतली व त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात मंत्रालयात सर्व सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. यावेळी अॅड.रोहिणी खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जोंधनखेडा धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी निधीची आग्रही मागणी केली होती त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. आजपासून प्रत्यक्ष धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचा कामाला आणि सांडव्याचा कामाला सुरुवात होत असून लवकरच या परीसरातील शेती मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली आल्यानंतर शेतकरी समृद्ध होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी कुर्हा परीसरातील शेतकरी बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.