आमदारांच्या आदेशाला केराची टोपली

0

एरंडोल । समन्वय समितीच्या सभेत बसस्थानक व परिसरातील समस्यांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तालुक्याची समन्वय समितीची सभा 2 मे रोजी तहसिलदार कार्यालयात आमदार डॉ.सतिष पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेत बस स्थानक परिसरातील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील यांनी तक्रार केली होती. समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.सतिष पाटील यांनी तक्रारींची त्वरित दाखल घेऊन बस स्थानक परिसरातील समस्या सोडविण्याचे आदेश आगार प्रमुखांना दिले होते. मात्र पंधरा दिवसांचा कालावधी उलटून देखील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आदेशाला आगार प्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे सर्व सामान्य नागरीकांमध्ये बोलले जात आहे.

बसस्थानक परिसरात अनेक गैरप्रकारांना आमंत्रण
बसस्थानक परिसरात वाढलेले काटेरी झुडपे, स्थानकाच्या प्रवेश द्वारावर पडलेला मोठा जीवघेणा खड्डा, स्थानकावर असलेली अस्वच्छता, बसेसची झालेली दुरावस्था, बंद असलेले पंखे याबाबत त्यांनी तक्रार केली होती. सभेस आगार प्रमुख व त्यांचे सहकारी गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार डॉ.पाटील यांनी त्यांना सभास्थळी बोलवून घेतले आणि अत्यंत कडक शब्दात कान उघाडणी केली होती. सभेत मांडण्यात आलेल्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आदेश आमदार डॉ.सतिष पाटील यांनी आगार प्रमुखाना दिले होते. मात्र सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी होऊन कोणतीही समस्या सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदारांच्या आदेशाला आगार प्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरु आहे.

समन्वय समितीच्या सभेत आमदारांनी आदेश दिल्यानंतर देखील दुर्लक्ष करणारे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची काय दाखल घेणार असा उपरोधिक प्रश्न नागरिक उपलब्ध करीत आहेत. सद्यस्थितीत बसस्थानक परिसराला सर्व बाजुंनी काटेरी झुडपांनी वेधले असून रात्रीच्या वेळी मद्यपींसाठी सदरची जागा सुरक्षित ठरत आहे. तसेच प्रेमी युगल देखील रात्रीच्या वेळी याठिकाणी अंधाराचा फायदा घेत अश्लीलचाळे करत असतात. बसस्थानक महामार्गाला लागून असल्यामुळे काटेरी झुडपे भुरट्या चोरट्यांसाठी सुरक्षित लपण्याचे ठिकाण झाले आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला असून प्रवाशाना त्याचा त्रास सहन करावा लागत असतांना देखील सदरचा खड्डा बुजविण्याचे साधे सौजन्य देखील महामंडळाने दाखविलेले नाही.

बस स्थानकाची दयनिय अवस्था
पिण्याच्या पाण्याची टाकी असलेल्या ठिकाणी मोठी घाण जमा झाली असून बसस्थानकाच्या आवारात सर्वत्र खड्डे पडले आहेत. बस आल्यानंतर सर्वत्र धुराळा उडत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून बस रस्त्यावर नादुरुस्त झाल्यास अनेक वेळा ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द केल्या जातात. रात्रीच्या वेळी लाईट बंद राहतात तर पंखे केवळ शोभेची वस्तू असल्याचे चित्र आहे. याबाबत आगार प्रमुखांनी त्वरित दखल घेऊन बस स्थानक परिसरातील समस्या सोडवून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.