भुसावळ। शहरातील बंद असलेली 47 दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यासाठी दारु विक्रेत्यांकडून दोन कोटी रुपये कुणी घेतले? याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांतर्फे वरणगाव रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चेकर्यांतर्फे आमदार संजय सावकारे यांच्या प्रतिमेला दारुचा नैवेद्य दाखवून दारुच्या बाटल्यांचा हार घालण्यात आला. तसेच दारुच्या बाटल्या फोडून निषेध करण्यात आला. यामुळे काहीकाळ भुसावळ – वरणगाव रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती. आंदोलन आटोपल्यानंतर पोलीसांनी वाहतुकीचा मार्ग मोकळा करुन दिला.
आमदारांच्या मागणीमुळे दारु विक्रेत्यांचा मार्ग सुकर होणार
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामार्ग, राज्यमार्गाच्या 500 मीटर अंतरातील बिअरबार, परमीटर रुम, देशीदारु, वाइनशॉपी बंद झाल्या. भुसावळातही यामुळे 47 दुकाने बंद पडली आहेत. मात्र, आमदार संजय सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना केलेल्या पत्रव्यवहारानुसार पालिका हद्दीतील रस्ते महामार्गातून वगळून अवर्गीकृत करावे, अशी मागणी केली आहे.
अन्यथा दारु हटाव महामोर्चा काढण्याचा इशारा
आमदार संजय सावकारे यांनी पालिकेस पत्र दिले असून नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दारु बचावसाठी चुकीचा ठराव करु नये. हा निर्णय झाल्यास बंद पडलेल्या 46 दारु दुकाने पुन्हा सुरु होऊ शकतात. त्यामुळे पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी याला विरोध दर्शवित वरणगाव रस्त्यावर ‘दारु हटाव, शहर बचाव’ अंतर्गत बाटली फोडा आंदोलन करण्यात आले. तसेच पालिका व जिल्हा प्रशासनाने आमदारांच्या पत्रास बळी पडू नये अन्यथा 2 जून रोजी पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर दारु हटाव महामोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनात विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. शहरातील दारुची दुकाने सुरु करण्यासाठी दोन कोटी रुपये घेणार्या नेत्याचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आंदोलनात राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख हरिष सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्या वनिता सुरवाडे, प्रल्हाद गायकवाड, दिपक अडकमोल, गजानन ठाकूर, आरिफ शेख, गोपी साळी, बापू गायकवाड, संतोष मेश्राम, छोटू निकम, राजेश मोटे, सुधीर जोहरे, बबलू सिध्दीकी, गजानन चर्हाटे, सरपंच अनिल सुरवाडे, अजय कोळी, राजू डोंगरदिवे, कलीम शेख, राजेश इंगळे, संजय इंगळे, अतुल बोदवडे, संगीता ब्राह्मणे, चंद्रकला कापडणे, रमेश गायकवाड, गौतम गायकवाड आदी सहभागी झाले होते.