एरंडोल । एरंडोल तालुका समन्वय समितीची सभा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सतिष पाटील होते. सभेत आमदार डॉ.सतिष पाटील यांनी पोलीस, वीज वितरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकार्यांना आक्रमक शैलीत खडे बोल सुनावले. यावेळी समन्वय समितीचे सदस्य तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांनी सभेचे आमंत्रण सदस्यांना देखील पाठविण्यात आले नाही अशी तक्रार करून महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. समन्वय समितीची सभा सकाळी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. सभेत कामचुकार व बेजबाबदारपणे वागणार्या अधिकार्यांना आमदार डॉ.पाटील यांनी खडे बोल सुनावून ग्रामीण भागातील समस्या तातडीने सोडविण्याची सुचना केली. सभेस पालिकेच्या मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्व विभागातल्या प्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारींची त्वरीत दखल घ्यावी
बसस्थानकावरील असलेल्या समस्यांबाबत रवींद्र पाटील यांनी तक्रार केली. आमदार डॉ.पाटील यांनी आगार प्रमुख शिरसाठ यांना चांगलेच धारेवर धरुन समस्या सोडविण्याचे आदेश दिले. कार्यकर्त्यांशी उध्दटपणाने बोलणारे पोलीस निरीक्षक केदारे यांना योग्य त्या शब्दात समज दिली. सभेत वीजवितरण, सामाजिक वनीकरण, वनखाते, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जलसंधारण, अंजनी प्रकल्प या प्रमुख शासकीय कार्यालयातील कामकाजाबाबत उपस्थित नागरिकांनी तक्रारी केल्या. सर्व कार्यालय प्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्या सोडवाव्यात अन्यथा नागरिकांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शहरातील पद्मालय नगर, वनाई नगर, आदर्श नगर, साई नगर, हनुमान नगर, सावता नगर याभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याकडे पालिकेने याबाबत त्वरित दखल घेण्याचे आदेश आमदार डॉ.पाटील यांनी दिले. सभेतच उपस्थित असलेले विविध गावातील सरपंच व पदाधिकारी यांचेत सर्वांच्या समक्ष आपापसात वाद झाल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सभेत आमदार डॉ. सतिष पाटील यांनी भाजप, शिवसेना पदाधिकार्यांच्या उपस्थितीतच केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर विनोदी शैलीत टीका केली. एका पदाधिकार्याने संबंधित अधिकारी आमची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करा अशी भाषा वापरत असल्याचे सांगताच आमदार डॉ.सतिष पाटील यांनी आता मुख्यमंत्र्यांना कोणी घाबरत नसल्याचे सांगितले. शिवसेनेच्या एका पदाधिकार्याने वीजवितरण कंपनीच्या कारभाराबाबत तक्रार केली असता शिवसेना आपली जुनी स्टाईल विसरली का असाही टोला मारला.
सभेत यांची होती उपस्थिती
सभेस तहसिलदार सुनीता जर्हाड, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, जि.प. सदस्य नाना महाजन, उपसभापती विवेक पाटील, माजी नगराध्यक्षा भारती महाजन, समन्वय समिती सदस्य एस.आर.पाटील, पल्लवी पाटील, सचिन विसपुते, डॉ.सुभाष देशमुख, डॉ.राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे, प्रा.मनोज पाटील, पं.स. सदस्य अनिल महाजन, आर.डी.पाटील, भिका कोळी यांचेसह सर्व शासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासोचे पदाधिकारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरवातीला अंजनी प्रकल्पात बुडून मरण पावलेल्या युवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विलास मोरे यांनी प्रास्तविक केले. निवासी नायब तहसिलदार आबा महाजन यांनी आभार मानले.