आमदारांनी इशारा देताच दिव्यांग बांधवांचा प्रश्न निकाली
महिन्याभरात प्रश्न मार्गी लावण्याचे पुरवठा अधिकार्यांचे आश्वासन
जळगाव – जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी दिव्यांग बांधवांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला व उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. या नंतर प्रशासनाला जाग आली व दिव्यांग यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे आश्वासन प्रशासनाने दिले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप होते असते. दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येकी 35 किलो धान्य वाटप करण्यात येतो. मात्र जळगाव शहरात कित्येक ठिकाणी रेशन दुकानदारांकडून हे वाटप होत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग सेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. यावेळी स्वतः आमदार राजूमामा भोळे यांनी या उपोषणाला आपले समर्थन दिले व या दिव्यांग बांधवांचे प्रश्न निकाली लागले नाही तर मी स्वतः उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. या इशार्यानंतर प्रशासन नरमले आणि उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी दिव्यांगांच्या मागण्या महिनाभराच्या आत पूर्ण करू असे आश्वासन दिले. यानंतर दिव्यांग बांधवांनी उपोेषण मागे घेतले.