मुंबई-धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीवरून धुळे जिल्ह्यात भाजपमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. दरम्यान आज त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात सरकारला घरचा आहेर दिला. पक्षात माझ्याबद्दल कट रचला जात असून माझ सरकार सत्तेत असून देखील माझ्यावर वाईट प्रसंग आहे अशी भावना आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत व्यक्त केली.
पक्षात गुन्हेगारांना वाव
माझ्या पत्नीबद्दल विनोद थोरात या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट लिहिली, त्याव्यक्तीला भाजपने पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला. गेल्या ३० वर्षापासून मी गुन्हेगारी संपावी यासाठी लढतो आहे. मात्र माझाच पक्ष गुन्हेगारांना वाव देतो आहे याची मला खंत आहे असे आमदार गोटे यांनी व्यक्त केली. वाल्याला पक्षात प्रवेश देऊन वाल्मिक करू असे सांगतात मात्र वाल्यांची टोळीच पक्षात घेतात, त्यांचे कसे वाल्मिक करणार असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला.
राज्यात आमदार सुरक्षित नाही
मी भाजपात जनसंघापासून आहे. माझे चरित्र हे निष्ठावंत आहे. माझ्या चारित्र्याशी जर कोणी खेळ करत असेल तर ते मी कदापी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात जर एक आमदार आणि आमदार पत्नी सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न आमदार गोटे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
विधानसभेत आमदार अनिल गोटे यांनी मनातील भावना व्यक्त करत गुन्हेगारी विषयी माहिती दिली. तसेच पत्नीला धमकी येते असे सांगितले. यावर मुख्यमंत्री यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.