आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की

0

मुंबई – काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी कराड तालुका पोलीसठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना निलंबित करत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणाची पोलीस महानिरीक्षकांकरवी येत्या १५ दिवसांत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर बोलत होते. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना तांबवे गावाजवळ आनंदराव पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या 25 ते 30 साथीदारांनी धक्काबुक्की केली होती. यावेळी अंगरक्षक कराड तालुका पोलीसठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपण स्वतः पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस आधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर आपण पोलीसठाण्यात गेलो. तेथे आपल्याला दोन तास बसवून ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या तक्रारीआधी पोलिसांनी प्रदीप पाटील यांना बोलावून घेऊन आपल्याविरोधात त्यांच्याकडून तक्रार घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील यांच्या स्पष्टीकरणाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार समर्थन दिले. रामहरी रूपनवर, शरद पाटील, जयवंत जाधव, शेकापचे जयंत पाटील यांनी हा आम्हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचा दावा केला. पाटील यांनी याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर केसरकर यांनी संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करत असल्याची घोषणा केली. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.