आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा

0

नागपूर । विधानपरिषदेवर निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हा दावा केला. पुढच्या महिन्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरता भाजपने आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.

हवे असल्यास याचा इतिहास तपासून बघा
नागपूर विभागातून पक्षाने विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराकरता आयोजित मेळाव्यात बावनकुळे यांनी हे वादग्रस्त विधान केले. पुढील महिन्यात नागपुरसह अमरावती, औरंगाबाद, कोकण आणि नाशिक विभागांतर्गत विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 जानेवारीला संपत असताना राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात खळबळजनक विधान केले. राज्य विधानपरिषदेवर नागपुरातून निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा त्यांनी केला. हे खरे आहे आणि हवे असल्यास याचा इतिहास तपासून बघा. पुणे आणि राज्याच्या इतर शहरात फंड विकत असल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यांनी असे विधान केल्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांसह सर्वचजण अवाक राहिले. बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र रुचले नाही आणि त्यांनी तसा इशारादेखील बावनकुळे यांनी केला.