आमदार-खासदारांच्या कार्यालयांना टाळे ठोकले

0

मुंबई । कर्जमाफी आणि हमी भावासाठी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस आहे. शेतकर्‍यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार आज आमदार, खासदारांच्या घर आणि कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अहमदनगरमध्ये भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरांसह इतर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तर तिकडे नंदुरबारमध्ये भाजपच्या खासदार हिना गावित, आमदर विजयकुमार गावित, चंद्रकांत रघुवंशी यांच्याघराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतः संपर्क कार्यालयाला टाळे लावले. तसेच शेतकरी संपाला पाठिंबा दिला. बार्शीतील त्यांचे निवासस्थान हेच त्यांचे संपर्क कार्यालय आहे. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी अगोदरच सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवास स्थानासमोर आजपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचा संप चिघळत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीड: माजलगावचे भाजप आमदार आर टी देशमुख यांच्या घराला टाळे ठोकले, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे कुलूप लावले.

सोपल यांनी स्वत: कुलुप लावले
राज्यात सुरु झालेल्य शेतकरी संप आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे़ लोकप्रतिनिधी च्या कार्यालयालया टाळे ठोकण्याचा आजचा कार्यक्रमामुळे बार्शीत आ.दिलीप सोपल यांच्याही घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ हा पोलीस बंदोबस्त पाहुन व शेतकरी संपाला पाठींबा देण्याच्या उद्देशाने आ.सोपल यांनीच स्वत: हुन आगळगाव रोड स्थीत ’सोपल बंगला ’ या कार्यालयास टाळे लावुन आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे. 288 व 78 आमदारापैकी आ.सोपल हे एकमेव स्वत: हुन कार्यालयास कुलुप ठोकुन शेतकरी संप आंदोलनास पाठींबा देणारे एकमेव आमदार ठरले आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चे काढून शासनाचा निषेध व्यक्त करू इशारा दिला होता़ त्याच पार्श्वभूमीवर शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर व संपर्क कार्यालयांवर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता़
अपर्णा गीते, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस दल़

सांगली डीवायएसपी ने शेतकर्‍यांना झोडपले?
शेतकर्‍यांच्या आंदोलनात मिरजेचे पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी आंदोलकांना पोलिस गाडीत बसवून काठीने झोडपून काढले आहे. त्यांनी ही कारवाई कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या कलमानुसार केली, याची चौकशी करा. त्याआधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी लेखी फिर्याद जनता दलाचे अध्यक्ष ऍड. के. डी. शिंदे यांनी आज विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली. शेतकरी संपाला पाठींबा देत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज तीव्र आंदोलन केले. आमदारांच्या घराला टाळे ठोकण्यासाठी काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेकाप, माकपचे कार्यकर्ते जमले होते. त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हे कार्यकर्ते घोषणा देतच पोलिस ठाण्यात गेले. ते आवरणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांना पाचारण करण्यात आले. पाटील यांनी पहिल्यांदा सबुरीने घेतले. मात्र क्षणात ’उचला’ असा आदेश दिल्यानंतर आंदोलकांना कॉलरला धरून, दंड पकडून गाडीत ढकलण्यात आले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर डीवायएसपी पाटील यांनी गाडीत जावून आंदोलकांना काठीने मारहाण केल्याचे व पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी त्याला साथ दिल्याचे ऍड. शिंदे यांनी लेखी फिर्यादीत म्हटले आहे. या आंदोलनात स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सांगली सुधार समितीचे ऍड. अमित शिंदे, माकपचे उमेश देशमुख, हमाल नेते विकास मगदूम आदींचा समावेश आहे. त्यांना सध्या तासगाव येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.