मुंबई । आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्यावरून विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात उडालेल्या गोंधळावर अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत दिलेल्या माहितीनंतर पडदा पडला. आमदार अनिल गोटेंच्या विधानाशी सरकार सहमत नाही आणि त्यांना बोलावून आपण याबाबत समज दिली आहे, अशा निवेदनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर त्यांच्याकडून पडदा पडल्याचे जाहीर केले.
संविधानाने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार दिलेले आहेत. त्यांचे सार्वभौमत्त्व आणि महत्त्व हे अबाधित असल्याचे विधान परिषदेत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली होती. यावर मुख्यमंत्री विधान परिषदेत आले आणि त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाचा गाभा या सभागृहाला साजेसा नाही. विधान परिषद हे ज्येष्ठ सभागृह आहे. परिषदेत अनेक विषयांवर मार्गदर्शन व्हावे, या हेतूने या सभागृहाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या सभागृहाबद्दल सरकारला संपूर्ण सन्मान असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. अनिल गोटे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक असून त्यांनी ते सदस्य म्हणून सभागृहात व्यक्त न करण्याची समज त्यांना दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विधानाला आपणही स्वतः वैयक्तिकरित्या सहमत नाहीच. मात्र, सरकारचेही या विधानाला समर्थन नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसमोर अनिल गोटे यांना समज दिल्याचे स्पष्ट केले. याचसोबत यापुढे या सभागृहाचा योग्य तो मान राखला जाईल, यात कोणतीही द्विधा नाही, याबद्दलही फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले. मुख्यमंत्र्यांच्या या विश्लेषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्याकडूनही या विषयावर पडदा पडल्याचे जाहीर केले. सुनील तटकरे, भाई जगताप, नारायण राणे, जयंत पाटील यांनी गोटे यांच्या विधानाबद्दल आक्षेप घेत राज्य शासनाने याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणी केली होती.