आमदार गोटेंवर कदमबांडेचा हल्लाबोल

0

धुळे । आ मदार गोटे,आता खुप झाले, आता होऊनच जावू द्या…गुड्ड्याला सॉफ्ट कॉर्नर तुमचाच. बर्थडे पार्टीमध्ये गोयरच्या खांद्यावर हात ठेवणारा कोण? शासकिय भुखंड बळकवणारा पुढारी आणि गुड्ड्या गुंड यांची जमिनीच्या व्यवहारातून गट्टी तर झाली नव्हती ना? अशा प्रश्नांची सरबत्ती करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकाद्वारे आमदार अनिल गोटेंवर जोरदार प्रहार केले आहे. टोळी युध्दातून गुंड गुड्डयाचा खून झाल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचकडून चौकशी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, सखोल चौकशी करा, एकही दोषी सुटता कामा नये, निवडणूकाजवळ आल्या की आमदार गोटे हे विरोधकांवर खोट्या कपोलकल्पीत आरोपींची राळ उडविणारे पत्रके काढतात. त्या बातम्यांची कटिंग मग निवडणूक काळात बॅनर बनविण्यासाठी वापरतात ही त्यांची पध्दत आता सर्वांच्या लक्षात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जमिनी हडप करून करोडो कमवणारे कोण ?
आमदार गोटे यांनी इतर काही खूनांच्या प्रकरणाचा उल्लेख त्यांच्या पत्रकात केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास चौकशी होऊन न्यायालयीन निकालही लागले आहेत. त्यामुळे याप्रकरणांचा राजकिय वापर किती दिवस करत राहणार? गुंड गुड्ड्या हा प्रॉपर्टी, प्लॉट, जमीनी बळकावण्याचा उद्योग करायचा याच प्रकारे विविध नामधारी संस्थांच्या आड कोट्यावधी रुपये किंमतीच्या शासकिय जमिनी हडप करुन त्यावर लाखो करोडो रुपये कमवत राहण्याचा धंदा धुळ्यात कोणत्या पुढार्‍याचा आहे. हे सर्वांनाच माहित आहे.त्यामुळे जमिनीच्या व्यवहारातून गुंड गुड्या आणि जमिनीवर डोळा ठेवणारा पुढारी एकत्र तर आले नव्हे ना? किंवा जमिनीच्या व्यवहारातून त्यांचे आपसात काही बिनसले नव्हते ना? या प्रश्नांचे उत्तर तपासी यंत्रणांनी शोधावे असेही मा.आ.कदमबांडे यांनी म्हटले आहे. मुळात आमदारांचे भाजपात डॅमेज झाले आहे. ज्या मोदी लाटेत ते निवडून आले, त्याचे क्रेडिट देखील ते आता लाथाडत आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक त्यांना स्वयंघोषीत पक्ष संघटनेवर लढवावी लागेल.

आमदार गोटेंनी शहर वेठीस धरल्याचा आरोप
पाऊस पडला नाही तरी ते त्यात माझाच हात असल्याचा आरोप करायला पुढे मागे होणार नाही. मुुंबई क्राईम ब्रँचने कोणत्याही राजकिय दबावाला बळी न पडता. याप्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी. गुंड गुड्डया याला आपण आयुष्यात कधीही समोर बघितले नाही. मात्र आमदारांनी काढलेल्या पत्रकात नामचीन गुंडाला फक्त गुड्डया चोर म्हटले आहे. त्यावरुन गुड्डयाबाबत त्यांच्या सॉफ्टकॉर्नर दिसून येतो. याशिवाय ‘गुड्डया हा गेल्या 8-10 दिवसांपासून जळीत कांडातील सहआरोपींना फोन करुन पैश्यांची मागणी करीत होता, ’17 रोजीच गुड्ड्याचे हत्याकांड घडवून आणण्यांची विरोधकांची तयारी होती.’ अशी विविध माहिती ते या पत्रकात देतात. जर हत्याकांडांची माहिती आमदाराजवळ होती. तर त्यांनी ही माहिती पोलिसांना का दिली नाही. गँगवॉर होण्याची आणि शहर वेठीस धरले जाण्याची वाट का पाहिली? हा प्रश्न उपस्थित होतो. कटकारस्थानाची माहिती आमदारांना होती तर पोलिसांना माहिती का दिली नाही?

विक्की गोयरच्या वाढदिवस पार्टीचा कार्यक्रम युट्युबवर
विक्की गोयरच्या वाढदिवस पार्टीचा संपूर्ण कार्यक्रम युट्युबवर आहे. त्यात गोयरचे निकटवर्तीय कोण-कोण राजकिय नेते, कार्यकर्ते, सहभागी आहेत. हे स्पष्टपणे दिसत आहेत. शिवाय हा बर्थडे पार्टीचा उर्वरित कार्यक्रम कोणत्या पुढार्‍याच्या घरी पार पडला. व तेंव्हा गोयरच्या खांद्यावर हात ठेवून कोण त्याला ‘आगे बढो‘ म्हणून आशिर्वाद देत आहेत. हे देखील कॅमेरात कैद झाले आहेत. याच गोयरच्या वाढदिवसाच्या बॅनरवर कुणा-कुणाचे फोटो आहेत ही बाब सुध्दा युट्युबवरील व्हिडीओ स्पष्टपणे दिसते. गोयर कोणाचा कार्यकर्ता हे स्पष्ट होईल. गोयरच्या फोटो व्हीडीओचे बुंमरँग कोणावर उलटणार आहेत. याचे उत्तर काळच देईल. मनपा जळीत कांडाची सखोल चौकशीची आणि दोषींवर कारवाईची आमची मागणी आधीपासूनची आहे.त्यानुसार प्रशासन काम करीत आहेत. निलंबीत कर्मचार्‍यांना कामावर घेणे ही प्रशासकिय प्रक्रिया आहे. महसुल आयुक्तांच्या मान्यतेने हे निर्णय होतात. एवढे सामान्य ज्ञानही आमदारांना असू नये याचे आश्चर्य वाटते.

गेल्या 15 वर्षात विकासकामांचा खोळंबा
15 वर्षात काय विकासकामे केलीत, कोणती गुन्हेगारी मुक्त केली? हा प्रश्न धुळेकर जनता विचारेल तेव्हा जनतेला दाखविण्यासाठी, फ्ले्नस बॅनरवर लावण्यासाठी काहीतरी वृत्तपत्रीय कात्रणे हवीत याच उद्देशाने त्यांचा हा खटाटोप सुरु आहे. 13 वर्षात त्यांनी कोणतेच विकासाचे काम केले नाही. शहर गुन्हेगारी मुक्त ऐवजी अधिकाधिक गुन्हेगारी युक्त बनवून टाकले. याचा जाब जनता विचारेल.त्यामुळेच त्यांनी आतापासूनच अकांड तांडव सुरु केले आहे. शहर गुन्हेगारी मु्नत होण्यासाठी सखोल चौकशी करा,कुणी का असेना, राजकारणी का असेना बिलकुल सोडू नका नुसते भाषण,घोषणा, पत्रके नकोत, कामाला लागा! धुळे शहर गुन्हेगारीमुक्त झालेच पाहिजे अशी माझी आणि माझ्या पक्षाची ठोस भुमिका आहे असेही माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.