राजगुरुनगर । हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काही शाळाबाह्य तरूण व समाजकंटकांकडून होणार्या हाणामार्या आणि एस. टी. स्टँड परिसरात मुलींची होणारी छेडछाड या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस खेड उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, खेड पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, सचिव निवृत्त एअरकमोडर गणेश त्र्यंबक जोशी, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्रचार्य जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
आमदार सुरेश गोरे यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व खेड तालुका एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्थांना एस.टी.स्टँड व महाविद्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयात मुलींसाठी स्वतंत्र तक्रार पेटी बसविण्याची सूचना केली. एस. टी. स्टँड व महाविद्यालयापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक व दोन्ही बाजूस 2 मीटरचा फूटपाथ लवकरच होणार असून त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन मुलांना महाविद्यालयात येण्या जाण्यास अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पालकांनी पाल्याच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे
महाविद्यालयाच्या आतमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची हाणामारी होत नाही. विद्यार्थी शिस्तीसंदर्भात वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची स्वतंत्र समिती कार्यान्वित करण्यात आली आहे, असे संस्था अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याचा अभ्यास, उपस्थिती, वर्तन याकडे विशेष लक्ष द्यावे. यासंबंधी वेळोवेळी महाविद्यालयाकडे चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संस्थेची असून महाविद्यालयात ओळखपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश नसतो. जे विद्यार्थी महाविद्यालयाच्या शिस्तीस बाधा आणतील त्यांचा प्रवेश रद्द करणार असल्याचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी सांगितले. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांनी लवकारात लवकर एस. टी. स्टँड परिसरात सी.सी.टी.व्ही. लावणार असल्याचे सांगितले.
…तर येथे करा संपर्क
विद्यार्थीनींची कोणी छेडछाड करीत असेल किंवा कोणी उगाचच त्रास देत असेल तर संबंधितांनी खेड पोलिस स्टेशन (0213522033), उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे (9923798438), पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव (9552500757) किंवा हुतात्मा राजगुरु महाविद्यालय प्रशासन (0213522099) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले
विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड
उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांनी महाविद्यालय परिसरात हाणामारी झाल्यास आमच्याशी तत्काळ संपर्क साधण्यास सांगितले. महाविद्यालयात मोबाईल आणणार्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे मोबाइल जप्त करावे तसेच संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून तत्काळ काढून टाकण्याची आणि विद्यार्थ्यांना ड्रेसकोड करण्याची सूचना त्यांनी संस्था व प्रशासनाला केली. याबाबतीत पालकांनी संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुलींच्या सुरक्षतेसाठी स्वतंत्र निर्भया पथकाची व्यवस्था केली असून महाविद्यालयात प्रवेश नसलेले बिनकामाचे कोणी दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.