मुक्ताईनगर : विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या समस्या जाणण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी चक्क एस.टी.तून प्रवास केल्याने प्रवाशांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आमदार पाटील यांनी पत्नी यामिनी पाटील व काही पदाधिकार्यांसह शुक्रवारी मुक्ताईनगर ते जळगाव प्रवास कला. तत्पूर्वी त्यांनी मुक्ताईनगर बस आगारात पाहणी केली.
नियमानुसार तिकीट काढून प्रवास
जळगाव जाण्यासाठी बसने निघालेल्या आमदार पाटील यांनी आपल्यासोबत असलेल्या आठ सहकार्यांचे बसच्या वाहकाकडून तिकीटदेखील काढले तर वाहकाजवळील आसनावर बसून त्यांनी प्रवास केला. पाटील यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती यामिनी चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, सुभाष पाटील, शुभम शर्मा व इतर सहकारी पदाधिकारी व एक अंगरक्षक अशा एकूण आठ जणांनी प्रवास केला.
सर्वसामान्यांचे मनात आमदारांनी निर्माण केले घर
एरव्ही आमदार म्हटले म्हणजे त्यांच्यामागे मोठा लवाजमा आलाच मात्र याबाबतीत आमदार पाटील सुरुवातीपासून अपवाद ठरले आहेत. सर्वसामान्यांमध्ये बसणे-उठणे, टपरीवर चहा पिणे, नाश्ता करणे लोकांमध्ये जाऊन चौकशी करणे, जेवणावळीच्या कार्यक्रमात पंगतीत खाली मांडी घालून जेवणास बसणे आदी वागणुकीमुळे आमदारांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. शुक्रवारी दुपारी ते जळगावला चक्क लाल परीतून प्रवासास निघाले म्हटल्यावर सर्वसामान्यांना त्यांच्यासोबत सेल्फिचा मोह होणार नाही तरच नवल! अनेकांनी त्यांचे फोटो काढून सोशल मीडियात टाकून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. प्रसंगी आमदारांनी समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचीदेखील ग्वाही दिली.