मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील कोरोना संदर्भात प्रचंड दक्षता घेत असून या संदर्भात ठोस उपाय योजना व्हाव्यात म्हणून त्यांनी पहिली आढावा बैठक घेत येथील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू कोविड 19 विलगीकरण तपासणी कक्षाची स्थापना केली. याच पार्श्वभूमीवर पुणे व मुंबई तसेच इतर राज्य व देशातुन परतणार्या सुमारे एक हजार 133 इतक्या नागरीकांनी तपासणी केली असून त्यांचे निगेटिव्ह रोपोर्ट आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे यांनी दिली. लोकसंपर्क टाळावा यासाठी त्यांचे हातावर शिक्के मारण्यात आलेले आहे त्यांनी बाहेर व नातेवाईकांत वावरतांना काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
नागरीकांनी घरातच थांबण्याचे आवाहन
दरम्यान, जनता कर्फ्यु व राज्यात संचार बंदी सारखे प्रयोग राबवून केंद्र व राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे मात्र तरीही काही नागरीक शासनाने दिलेल्या सुचना पाळत नसल्याने व मोकळे फिरत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोना संदर्भात काय-काय करावे यांच्या सूचना देणारी जनजागृतीपर ध्वनिफीत ध्वनिक्षेपकामार्फत रीक्षाद्वारे मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील गावांसह मतदार संघातील रावेर तालुक्यातील गावांत फिरविली जात आहे तसेच बोदवड व मुक्ताईनगर, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना मतदारसंघात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.