आमदार चंद्रकांत पाटील यांचे जल्लोषात स्वागत

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करूनही उद्धव ठाकरेंकडून मिळाली नाही न्याय मात्र एकनाथ शिंदे धावून आले ः आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरात महाविकास आघाडी सरकारकडून पराभूत उमेदवारांना (माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता) पाठबळ दिले जात होते. विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम मतदारसंघांमध्ये सुरू होते. आमच्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतरही दिलासा मिळत नव्हता. या कठीण काळात विधी मंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे हे आमच्या मदतीला धावून आले. हीच व्यथा शिवसेनेच्या सर्व आमदारांची होती त्यामुळे गेला दीड वर्षापासून शिवसेनेच्या आमदारांची घुसमट होत होती. आमच्या असंतोषाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या रूपाने जनक मिळाले आणि राज्यात सत्तांतर घडले. अतिशय उमद्या नेत्याकडे राज्याची धुरा आलेली असून पुढील अडीच वर्ष आशादायी असणार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असेल. अपक्ष आमदार म्हणून मंत्रीपद मिळावे असे वाटते, मंत्री पद मिळो अथवा नाही मिळो या पुढे ताकदीने काम करू, अशा शब्दात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांचे भव्य स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जमली. श्री क्षेत्र कोथळी येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताईचे दर्शन घेऊन 12 वाजेच्या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रवर्तन चौकात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रवर्तन चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आमदार पाटील यांनी अभिवादन केले. नंतर उघड्या जीप वर उभे राहत त्यांचे निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली.

उपस्थितांना वाटले बुंदीचे लाडू
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना बुंदीचे लाडू वाटण्यात आले. विरोधकांना उपहासात्मक टोला हाणल्याचे यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

भाजप आमदारांनी घेतली भेट
गेले 13 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे गुरुवारी मुक्ताईनगर पोहोचले. गुरुवारी मुक्ताईनगर जवळील कोथळी येथे भाजपच्या लोकसभा बूथ सक्षमीकरण अभियान कार्यक्रमानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, मुक्ताईनगर भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, अमित देशमुख, उमेश महाजन यांनी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमूख छोटू भोई, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, नवनीत पाटील, जीवराम कोळी, भागवत कोळी, शिवाजी पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, मुकेश वानखेडे, पियुष मोरे, आरीफ आझाद, गोपाळ सोनवणे, ब्रिजलाल मराठे, महेंद्र मोंढाळे, विनोद पाटील, मोहन बेलदार, सुधीर कुलकर्णी, सुरज परदेशी, शांताराम कोळी, छोटू पाटील, दीपक माळी यांच्यासह शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक कार्यकर्ते मित्र परीवारातील सदस्य उपस्थित होते.