आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन स्तरावर केलेल्या तक्रारीमुळे रखडली शेतकऱ्यांची केळी पीक विम्याची रक्कम — -माजी मंत्री आमदार खडसे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
मुक्ताईनगर प्रतिनिधी……
केळी पिक विमा च्या संदर्भातील कर्की तालुका मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मुळे तसेच शासन स्तरावर प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांची रखडलेली असून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केल्याप्रमाणे 12 टक्के व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम कधी मिळणार ? असा प्रश्न 22 रोजी शहरातील संवेदना फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
मुक्ताईनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या समवेत राष्ट्रवादी किसान सेलचे सोपान पाटील, बोदवड चे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, रमेश (गोटू )महाजन, दिनकर महाजन, योगेश कोलते उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या संदर्भात असंतोष असून एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यावर मिळणे आवश्यक असताना एक महिन्याच्या वर वेळ निघून गेला तरी अद्यापही पैसे मिळालेले नाही. दरम्यान नियमानुसार विमा कंपनीने रक्कम दिली नाही तर बारा टक्के व्याज त्यावर लावून दिले जाते. त्यामुळे १२ टक्के व्याजासहित पैसे देण्याची मागणी देखील आमदार खडसे यांनी केली.
जिल्ह्यात एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रावर ऑनलाईन नोंदणी केलेली असून ती शासन स्तरावर मात्र 32000 हेक्टर एवढी दिसत आहे.तर कृषी विभागाकडून पाठवलेल्या अहवालात केवळ 52 हजार हेक्टर शेतजमिनीचा केळी पिक विमा काढल्याचे दिसून येत आहे. सदर तफावतीमुळे विमा मिळण्यास उशीर झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान एकोणवीस सप्टेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 76 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांना विमा देण्याची घोषणा केली. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी 76 हजार हेक्टर शेत जमिनीवरील शेतकऱ्यांना 12 टक्के व्याजासह विमा रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही? असा प्रतिप्रश्न खडसे यांनी याप्रसंगी केला.
दरम्यान विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही स्वतः खात्री केल्यानंतर विमा देऊ,असे असेल तर अद्यापही कोणत्याही प्रकारची तपासणी विमा कंपनीकडून करण्यात आलेली नाही.14 जून 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी करकी तालुका मुक्ताईनगर येथे स्टिंग ऑपरेशन तहसीलदार श्वेता संचेती यांच्या समवेत केले होते व पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पकडून दिले होते. तसेच पाच नोव्हेंबर 2022 रोजी आमदार पाटील यांनी प्रधान सचिव कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना उशिरापर्यंत पिक विमा मिळाला नसल्याची देखील तक्रार खडसे यांनी केली. दरम्यान जिओ ट्रेकिंग बघायचे असेल तर नोव्हेंबर डिसेंबरच्या काळातील घेण्यात यावे असे सोपान पाटील यांनी सांगितले.
सी एम व्ही या रोगाच्या संदर्भात तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपूर्वी मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेच्या दरम्यान घोषित केलेले होते मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सीएमवी रोगाचे कोणत्याही प्रकारचे नुकसानी नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्यापही कोणताही लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा टोला आमदार खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकर न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी जाहीर केल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा देखील माजी मंत्री खडसे यांनी याप्रसंगी पत्रकार परिषदेत दिला