आमदार चषक कबड्डी : मुंबई बंदर संघाचा रोमहर्षक विजय

0

मुंबई । आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमिनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला. तसेच मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि बलाढ्य भारत पेट्रोलियमने देखण्या विजयासह आपले विजयी अभियान सुरू केले.

प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावर चवन्नी गल्लीत माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारामुळे प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांनी संयुक्त आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील उद्घाटनीय सामना नियोजित वेळेनूसार 6 वाजता एअर इंडिया आणि मुंबई बंदर यांच्यात खेळला गेलेला सामना ख़र्‍या अर्थाने चढउतारांचा सामना होता. शिवराज जाधव आणि गणेश डेरंग यांच्या जोरदार चढायांनी एअर इंडियावर लोण चढवत बंदराला पहिल्या दहा मिनिटातच 15-10 अशी आघाडी मिळवून दिली होती.

तेव्हाच एअर इंडियाच्या उमेश म्हात्रेच्या एका चढाईने सामन्याचा सारा चेहरा बदलून टाकला. त्याने एकाच चढाईत मैदानात असलेले चारही खेळाडू बाद करून बंदरवर अनपेक्षितपणे लोण चढवला. या चढाईमुळे पिछाडीवर असलेली एअर इंडिया मध्यंतराला 24-17 अशी आघाडीवर पोहोचली. उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच तिसर्‍या मिनिटालाच त्यांनी आणखी एक लोण चढवत बंदरवर 28-20 अशी जबरदस्त आघाडी मिळवली. हा गुणफलक पाहताच एअर इंडियाचा विजय निश्‍चित वाटत होता. फक्त त्यांना संयमी खेळाची गरज होती.

पण सामन्याने पुन्हा एकदा रंग दाखवला. 22-31 अशा पिछाडीवर असलेल्या बंदरच्या संघात जान आणली शिवराज जाधवच्या एका भन्नाट चढाईने. त्याने एअर इंडियाच्या रक्षकांना चकवत टिपलेले 3 गुण स्फूर्तीदायक होते. या गुणांमुळे त्यांनी केवळ 31-31 अशी बरोबरीच साधली नाही तर लोणही लादला. त्यानंतर बंदराच्या चढाईबहाद्दरांनी आपल्या गुणांचा सपाटा कायम राखत सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केली. तेव्हाच दिपक गिरीने 3 खेळाडू बाद करून पाच मिनिटांच्या कालावधीत संघाला आणखी एक लोण चढवून दिला. त्यानंतर आघाडीवर असलेल्या बंदरची आघाडी कमी करणे एअर इंडियाला शक्य झाले नाही आणि त्यांना 43-51 अशी 8 गुणांनी हार सहन करावी लागली. मुंबई बंदरच्या गणेश डेरंग आणि शुभम पुंभार यांनी अफलातून पकडींचा खेळ करून दाखवला.प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियमने आपली सलामी दणदणीत दिली. नितीन मदनेने प्रारंभीच एका खोलवर चढाईत युनियन बँकेच्या क्षेत्ररक्षणावर दरोडा घालत 4 गुण टिपले. मग पुढच्याच मिनीटात आकाश मुंडेने दोन गडी बाद करीत युनियनवर लोण लादला. रिशांक देवाडिगासह खेळत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या खेळाडूंचा खेळ इतका जबरदस्त होता की दुसरा लोण चढवायला त्यांना फार वेळ लागला नाही. 15 मिनिटांतच दुसरा लोण चढवत त्यांनी 19-2 अशी निर्णायक आघाडी घेतली होती.