आमदार चाबुकस्वार यांचे नागपूरमध्ये आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – प्राधिकरणातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के परतावा व पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी या मागणीसाठी पिंपरीचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात निर्णय होऊनही वेळकाढूपणा चालू असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील या दोन प्रश्‍नांसाठी विधानसभेतील पायर्‍यांवर उभे राहून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले. चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सत्यजित पाटील, राजन साळवी, सुजीत मिणचेकर, सुरेश गोरे, प्रकाश आबीटकर आदी आमदारांनी यामध्ये भाग घेतला.

प्रशासकीय सुस्ततेमुळे प्रश्‍न लटकून
प्राधिकरणातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के जमिन परतावा मिळावा यासाठी चाबुकस्वार यांनी यापूर्वी तीनवेळा नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्या समवेत बैठक घेतली होती. हा विषय अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याकडे प्रलंबित आहे. तशीच परिस्थिती शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मिती बाबत झाली आहे. निर्णय झाला, परंतू अर्थ खात्याची मान्यता तसेच प्रशासकीय सुस्तपणामुळे हा देखील प्रश्‍न लटकून राहिला आहे. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चाबुकस्वार यांनी या प्रश्‍नी विधानसभेत लक्षवेधीही मांडली होती.

सरकार तातडीने निर्णय घेत नाही
सकाळी अकरा वाजता या दोन प्रश्‍नांच्या मागणीचे बॅनर फडकावत चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व आमदार विधानसभेतील पायर्‍यांवर आले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या जिव्हाळयाचे हे दोन प्रश्‍न आहेत. गेली तीन वर्षे सातत्याने आपण हे प्रश्‍न सोडविण्याची मागणी करत आहोत. परंतू सरकार तातडीने निर्णय घेत नाही. येत्या दोन महिन्यात हे दोन्ही प्रश्‍न निकाली लागले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.