आमदार डॉ. सतीश पाटील बचावले!

0

मुंबई- काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघाचे आमदार डॉ. सतीश पाटील यांना आला आहे. डॉ. पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक 125 मधील छत कोसळल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. त्यांच्या अँटी चेंबरमधील पीओपीसहित छताचा काही भाग त्यांच्या बेडवर कोसळला आहे. शनिवार, रविवार अधिवेशनाला सुट्टी असल्याने ते गावी गेले असल्यामुळे या दुर्घटनेतून बचावले. आज, अधिवेशनासाठी सकाळी आपल्या खोलीवर आल्यानंतर दृश्य पाहून ते थबकले.

अधिवेशन सुरू असते तर आज मी मेलोच असतो. विधानसभेत मला श्रद्धांजली व्हावी लागली असती, अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. खोलीतील दृश्य पाहून अंगावर शहारेच आले, असेही त्यांनी सांगितले. पाटील यांच्या चेंबर मधील पीओपीसहित छताचा बराच मोठा भाग त्यांच्या बेडवर पडला आहे. पंखा देखील तुटून खाली आला असून भिंतीला देखील यामुळे तडे गेले आहेत. अवघ्या 25 वर्षाच्या मनोरा आमदार निवासाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असल्याचेच या घटनेतून समोर आले आहे. सरकारच्या अनास्थेमुळे असे प्रकार घडत असून आज याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.