भुसावळ । केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी अटल योजना भुसावळात मंजूर झाली असलीतरी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या व केंद्राने प्रशासकीय मान्यता दिलेल्या ९०.८५ कोटीच्या योजनेच्या निविदेसाठी संबंधित तीन कंपन्यांनी दर भरले होते मात्र जळगावच्या जैन एरिगेशनने सर्वाधिक कमी मात्र प्रसिद्ध निविदेपेक्षा जास्त १२ टक्के रक्कम भरल्याने हा भुसावळकरांसाठी सर्वाधिक भूर्दंड होता. शुक्रवारच्या सभेत सत्ताधार्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पुन्हा संबंधिताशी वाटाघाटी वा फेरनिविदा काढण्याचा पवित्रा घेतला. दुपारनंतर संबंधित कंपनीच्या अधिकार्यांशी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सविस्तर चर्चा करून शहरवासीयांच्या हितासाठी तडजोड करण्याची विनंती केली व ती संंबंधित कंपनीने मान्य करीत सात टक्क्यापर्यंत निविदा आणण्याची हमी दिल्याने आगामी ५० वर्षांचा पाणीप्रश्न निकाली निघाला.
शहर विकासाला सुरुवात : संजय सावकारे
मागील सत्ताधार्यांच्या काळात जी अनियमितता झाली ती आता यापुढे होणार नाही, असे सांगत आमदार सावकारे यांनी १७ पासून घर-घर कचरा संकलनाला व अन्य विकासकामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली. सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता पूर्ण होणार असून नवीन बंधारा आता बांधण्यात येणार असून पुढील आठवड्यात त्याबाबत बैठक असल्याचे ते म्हणाले.
आता खर्या अर्थाने शहराचा विकास : रमण भोळे
अमृत योजनेबाबत यशस्वी वाटाघाटी झाल्याने शहराचा आता खर्या अर्थाने विकास होईल, अशी भावना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केली. रॉ वॉटर पंपींग स्टेशन, रायझिंग मेन, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन असे योजनेचे स्वरूप राहणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत आता पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. १७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अष्टभूजा मंदिरापासून घर घर कचरा संकलनास सुरुवात होईल तसेच शहरातील रस्त्यांची डागडूजी व अन्य कामांना सुरुवात होईल, असे त्यांनी सांगत विरोधक तक्रारीत गुंग आहेत मात्र आम्हाला शहर विकास साधायचा आहे, असा टोला त्यांनी लगावला.
यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, प्रा.सुनील नेवे, रमेश मकासरे, प्रा.दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, शफी पहेलवान, किरण कोलते, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.