भुसावळ। शहरातील समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी निष्क्रिय आहेत. त्यामुळेच भुसावळ शहर हे देशातील दुसर्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून गणले जात असल्याची नामुष्की ओढविली आहे. मात्र यावर विरोधकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असून यापुढे नगराध्यक्ष आणि आमदारांच्या घरावर जुता मारो आंदोलन करण्याचा इशारा पिआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिला. भुसावळ शहर हे अस्वच्छ शहर म्हणून जाहीर झाल्यानंतर जनाधार पार्टीतर्फे शहरात अष्टभुजा मंदिरापासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी सोनवणे बोलत होते. यावेळी जनाधारचे गटनेता उल्हास पगारे, नितीन धांडे, प्रदीप देशमुख यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नैतिक जबाबदारी स्विकारुन नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा
यावेळी टिका करताना सोनवणे म्हणाले की, सत्ताधिकार्यांनी 100 दिवसात शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र झाले उलटेच, शहरावर नामुष्की ओढविली असून त्याचे खापर आता आमच्या माथी फोडण्यात येत आहे. शहरातील विविध समस्यांसंदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलने केलीत, तरी देखील सत्ताधिकार्यांना जाग येत नाही, हे गेंड्याच्या कातडीचे असून त्यांना शहरातील नागरिकांच्या समस्यांशी काही एक देणे घेणे नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले तसेच गेल्या तीन वर्षांपासून मुख्याधिकारी बाविस्कर हे पालिकेचा कार्यभार सांभाळत आहेत. मुख्याधिकार्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शहरावर हि नामुष्की ओढविली आहे, मुख्याधिकारी केवळ तीन दिवस कामावर येतात, ते कामचुकार असून मुख्याधिकारी बाविस्कर यांना निलंबित करण्यात यावे. तसेच 100 दिवसात शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन देऊनही शहराचा विकास न झाल्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्गत झालेल्या सर्वेक्षणात शहर अस्वच्छ शहर म्हणून घोषीत करण्यात आले. याची नैतिक जबाबदारी स्विकारुन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली.