मुंबई: नारायण राने यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी महामार्गावर चिखल असल्याने अधिकाऱ्याला जबाबदार धरत अधिकाऱ्यावर चिखलफेक केली होती. याप्रकरणी त्यांना अटक होऊन कोठडीत सुनाविण्यात आली होती. दरम्यान पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 9 जुलैपर्यंत नितेश यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र, राणेंच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी झाली, त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 23 जुलैंपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
नितेश राणेंसह त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
कणकवली शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, शहराध्यक्ष राकेश राणे, नगरसेवक अभिजित मुसळे, संदीप नलावडे, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, गटनेते संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, सभापती सुजाता हळदिवे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, निखील आचरेकर, सचिन पारधीये, किशोर राणे आदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केली.