आमदार निवास दुरुस्ती घोटाळ्यावरून गदारोळ

0

नागपूर : मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेला घोटाळा विधानसभेत चांगलाच गाजला. या विषयावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्वाइंट ऑफ इंफर्मेशनच्या अंतर्गत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा चर्चेला आणला. या प्रकरणात छोट्या अधिकार्‍यांवर कारवाई करून बड्या अधिकार्‍यांना संरक्षण देऊ नका, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी अधीक्षक अभियंत्याच्या मार्फत करून हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोहींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विशेष बाब म्हणजे, या घोटाळ्याला सर्वात प्रथम दैनिक जनशक्तिनेच वाचा फोडली होती.

अधिकारी बेशरम, नालायक झालेत!
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मनोरा आमदार निवास दुरुस्ती घोटाळा हा अत्यंत मोठा असल्याचे सांगत, आमदारांच्या निवासात असा प्रकार करण्याची अधिकार्‍यांची हिंमत कशी होते असे सांगत अधिकारी इतके बेशरम आणि नालायक झालेत असे म्हटले. चौकशीसाठी आमदारांची चौकशी समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली. या विषयावर विधानसभेत लक्षवेधी चर्चेला येऊ नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत अधिकार्‍यांची मजल गेली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. माझ्या रूममध्ये 28 लाखाची दुरुस्ती दाखवली असल्याचे सांगत, त्यांनी छोट्या अधिकार्‍यांवर कारवाई करून अधिकार्‍यांना संरक्षण देऊ नका, अशी मागणी केली. यावर हा घोटाळा उघड करणारे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी 30 आमदारांच्या खोल्यात काम न करताच बिले काढली असल्याचे सांगितले. याबाबत मी जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा सगळा गैरप्रकार समोर आला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. खोटे टेंडर, खोटी मोजमापे, खोटी बिले काढनार्‍या या अधिकार्‍यांवर मोक्का लावला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

सखोल चौकशी करणार : चंद्रकांतदादा
बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सगळ्या विषयाची चौकशी करून दोन उपअभियंत्यांना निलंबित केले आणि एका कार्यकारी अभियंत्याची बदली केली आहे, असे पाटील यांनी सांगितले. या विषयाची सखोल चौकशी करून कारवाई करु असे आश्वासनही त्यांनी दिले. यावर त्या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाईची मागणी करत स्वपक्षीय सदस्य आक्रमक झाले. यावर पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांकडून चौकशी करून चौकशी अहवाल आल्यावर कारवाई करू, असे सांगितले.

घातपात करण्याचा प्रयत्न!: सतीश पाटील
भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी खुलासा केला की सदर दुरुस्तीचे काम लपविण्यासाठी माझ्या खोलीचे छत पाडले. यावर, हा प्रकार अतिशय गंभीर असून, हा तर घातपात करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.