आमदार बच्चू कडू अडचणीत?

0

मुंबई : आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे संकेतच हेमा मालिनी यांनी दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी हेमा मालिनी यांच्याविषयी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे.

सुरुवातीला मी याकडे पब्लिसिटी स्टंट म्हणून दुर्लक्ष केले. पण हे वक्तव्य चुकीचे असल्याचे माझ्या जवळच्या व्यक्तिंनी मला सांगितले. यामुळेच आता मी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. तणावग्रस्त शेतकरी दारू पितात आणि दारु पिण्याच्या सवयीच्या आहारी गेल्याने ते आत्महत्या करतात, हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न बच्चू कडू करत होते. परंतु, आपले म्हणणे मांडताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. हेमामालिनी रोज दारू पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का? असा सवालही त्यांनी विचारला होता. पण या विधानावर वाद झाल्यानंतर मात्र आमदार बच्चू कडू यांनी सारवासारव केली. हेमा मालिनी चित्रपटामध्ये दारू पितात असे मला म्हणायचे होते, असा खुलासा बच्चू कडू यांनी त्यावेळी दिला होता. दरम्यान, आता याच वक्तव्याचा हेमा मालिनी कायदेशीररित्या समाचार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.