आमदार भेगडे यांचा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून विशेष सत्कार

0

निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य शासनाचा पाच कोटींचा मुलभूत सुविधांसाठी मिळणारा निधी मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांचा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने सन्मान चिन्ह व पुणेरी पगडी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राज्य शासनाने नुकताच राज्यातील सात कटक मंडळांना (कॅन्टोन्मेंट बोर्डांना) मुलभूत सुविधांसाठी निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला. यात महानगरपालिका क्षेत्रालगतच्या बोर्डांना पाच कोटी व नगरपरिषदा व ग्रामपंचायती आदी ग्रामीण भागालगतच्या बोर्डांसाठी साडेतीन कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी केला मंजूर निधी
या पार्श्‍वभूमीवर देहुरोड बोर्डाला पाच कोटींचा निधी तातडीने प्राप्त व्हावा यासाठी आमदार भेगडे यांनी शिष्टमंडळासह नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर अर्थमंत्र्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. आमदारांच्या या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल तसेच बोर्डाला प्रथमच राज्यशासनाचा एवढा निधी उपलब्ध होणार असल्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने आमदार भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी, सदस्य व बोर्डाचे विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच भेगडे यांचे स्वीय सहाय्यक रामनाथ गरूड, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक शेलार उपस्थित होते.

उड्डाणपूल करण्याची मागणी
बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी प्रास्ताविक भाषण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले. देहू फाटा येथे व्हेईकल अंडरपासची लष्कराची मागणी आहे. मात्र, त्यासाठी लष्कराची अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी असा रस्ते विकास मंडळाचा आग्रह आहे. हा तिढा मिटविण्यासाठी आता अंडरपास ऐवजी उड्डाणपूल करण्यात यावा, अशी मागणी ब्रिगेडियर वैष्णव यांनी आमदार भेगडे यांच्याकडे केली. यावर रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भेगडे यांनी आश्‍वासन दिले. राजु गुरव यांनी सूत्रसंचालन केले. रघूविर शेलार यांनी आभार व्यक्त केले.