निराधारांना आधार देणे कौतुकास्पद बाब- आ. भेगडे
क्लबतर्फें हा वृद्धाश्रमात मिळणार सर्व सुविधा
तळेगाव दाभाडे : जीवनात आपल्या स्वतःच्या घरासाठी सर्वजण प्रयत्न करतात. परंतु मतिमंद, निराधार, वंचित व ज्यांना मुले नाहीत किंवा मुले असुनही त्यांचा सांभाळ केला जात नाही. अशांचा सांभाळ व्हावा, त्यांचा वृध्दापकाळ आनंदात जावा, त्यांना आधार मिळावा या उदात्त हेतूने प्रेरीत होऊन माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा व लायन्स क्लब ऑफ तळेगावचे सहकारी यांच्या प्रयत्नातून सर्व सोयींयुक्त वृध्दाश्रम बांधून निराधारांना आधार देत आहे ही कौतुकास्पद व अनोखी बाब आहे. तळेगाव लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी समाजाला आदर्श ठरेल असे काम केले आहे, असे प्रतिपादन मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी केले.
मावळमधील अहिरवडे येथे लायन्स क्लब ऑफ तळेगाव, किनारा वृध्द व मतिमंद सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स दीपक शहा किनारा वृध्दाश्रम भवनचे उद्घाटन आमदार भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पटवा होते. यावेळी व्यासपीठावर क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा, उद्योजक जयकुमार चोरडीया, चंद्रहास शेट्टी, श्रीकांत सोनी, क्लबच्या अध्यक्षा राजेश्री शहा, निलेश जैन, सुचित्रा चौधरी, सरपंच साळवे, माजी सरपंच बरकुले आदी उपस्थित होते.
आवश्यक ती मदत करणार
आमदार भेगडे पुढे म्हणाले की, आज स्वतःच्या घरासाठी सर्वच प्रयत्न करतात, परंतु समाजातील मतिमंद, वृध्द, निराधार, वंचितांसाठी येथील संस्था आधार देते. ही अनोखी तसेच कौतुकास्पद बाब आहे. येथील वृध्दाश्रमात सामाजिक जाणिवेतून मतिमंद, निराधार, वृध्दांना आधार देण्याचे काम केले जाते. त्यांना आधार देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागविली जाते. दुर्बलांना शक्ती व सामर्थ्य देणारी संस्था आहे असेच मी समजतो. सरकारी पातळीवर जी आवश्यक मदत लागेल ते पूर्ण केली जाईल. वृध्दाश्रमातील वयोवृध्दांची भेट घेऊन भेगडे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली.
कोणतेही मानधन घेतले जात नाही
संस्थेच्या संचालिका प्रिती वैद्य म्हणाल्या, येथील संस्थेत वृध्दांची सेवा करण्याकरीता कोणतेही मानधन घेतले जात नाही. किनारा वृध्दाश्रम हा सर्वांचा आहे. प्रांतपाल रमेश शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते नंदकुमार काळोखे, मयुर राजगुरव, राजेंद्र पटवा, सुभाष हिंगणे, विजय हांडे, सुशिल जगताप आदींचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कुलकर्णी यांनी केले तर आभार लायन क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा राजेश्री शहा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त रेखा देशमुख, अमृता कुलकर्णी, निलेश जैन, सुचित्रा चौधरी, विकास देशमुख आदींनी केले.