पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाचे भोसरीत स्थलांतर
नागरिकांना सहकार्य करण्याचे अधिकार्यांना आवाहन
भोसरी : पुण्यात असणारे अन्नधान्य वितरण (रेशनिंग) कार्यालयाचे अखेर भोसरीत स्थलांतरण झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आमदार महेश लांडगे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भोसरीतील पांजरपोळ येथे सुरु झालेल्या अन्नधान्य वितरण कार्यालयाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, कमल घोलप, योगिता नागरगोजे, यशोदा बोईनवाड, स्वप्नील म्हेत्रे, साधना मळेकर, सारिका लांडगे, नगरसेवक सागर गवळी, संतोष लोंढे, नितीन लांडगे, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, गोपीकृष्ण धावडे, विजय लांडे, दिनेश यादव, सम्राट फुटे उपस्थित होते. यावेळी आमदार लांडगे यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयातील अधिकार्यांना कायम नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कामकाज नीट पार पाडावे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, गेले 20 ते 25 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना रेशनिंगच्या कामासाठी पुण्यामध्ये जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या पैसे आणि वेळेचा अपव्यय होत होता. त्यासाठी रेशनिंगचे कार्यालय भोसरीत व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे प्रयत्न केला. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत भोसरी मतदार संघात स्वतंत्र परिमंडळ कार्यालय ‘फ’ विभाग मंजूर करण्यात आला. त्यानुसार इतर मतदार संघात देखील स्वंतत्र कार्यालय होणार आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. सर्व रेशनिंग दुकानदारांना सोबत घेऊन त्यांच्याशी समन्वय साधला जाईल. रेशनिंग विभागाचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडावे. कोणालाही अडचण निर्माण होणार नाही.
सहकार्य कायम ठेवावे
महापौर राहुल जाधव म्हणाले की, रेशनिंग कार्यालयातील अधिकार्यांचे कायम नागरिकांना सहकार्य असते. यापुढे देखील सहकार्य कायम ठेवावे. कार्यालय स्थलांतरासाठी आमदार महेशदादांनी मोलाचे सहकार्य केले माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, गेले 20 ते 25 वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला होता. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून तो मार्गी लागला आहे. रेशन कार्यालय या परिसरात झाल्यामुळे नागरिकांना मनस्वी आनंद झाला आहे. सर्वांना सोबत चांगले काम करु असे परिमंडळ अधिकारी एन.पी. भोसले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन संजय गांधी निराधार योजनेचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष तुकाराम बढे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती फुगे, दिलीप तापकीर, बाळासाहेब गोडसे, बी.टी.फुगे, प्रवीण डोळस यांनी केले.