आमदार महेश लांडगे शिरूरमधून ‘बॅक फुट’वर’?

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडून आलेले भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांची अस्वस्थता वाढली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार होण्याची इच्छाशक्ती त्यांनी बागळली आहे आणि आमदार झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून तशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच त्यांनी लोकसभा मतदारसंघातील बैलगाडा शर्यतीच्या प्रश्नाला हात घातला; पण कमी अभ्यास व अतिउत्साहातून करत गेलेल्या आंदोलनामुळे हा प्रश्न आणखीच चिघळला. यातून प्राणीमित्र संघटनांना डिवचण्याचेही अनेक प्रकार झाले. त्यामुळे पुन्हा हा प्रश्न ‘जैसे-थे’च राहिला. यावर खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी उच्च न्यायालयात पुन्हा हे प्रकरण जाण्यास राज्य शासनच जबाबदारी आहे, अशी जाहीर टीकाही केली. तर आमदार लांडगे यांनी सरकारची भूमिका सकारात्मकच होती असे सांगितले आहे. असे असले तरी अप्रत्यक्षरित्या आमदार लांडगे यांना बैलगाडा शर्यती प्रकरणामुळे शिरुरमधून ‘बॅकफूट’वर जावे लागले आहेत. यातूनच बैलगाडा शर्यत ही लोकसभेमुळे आढळराव व लांडगे यांना प्रतिष्ठेची झाली आहे हे मात्र नक्की.

शर्यतीला न्यायालयाची वेसन
मे 2014 ला बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातल्यापासून पुणे जिल्हयातील शेतकर्‍यांच्या प्रतिष्ठेचा असलेला हा खेळ कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्यानंतर शेतकर्‍याच्या भावनांचा आदर करुन शिरुरचे खासदार आढळराव यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सर्वप्रथम जुलै 2014 ला बैठक घेऊन बैलगाडा शर्यतीबाबतचे प्राणीमित्र संघटनेचे आरोप बिनबुडाचे असून ही शर्यत काही सेकंदापुरती असल्याने बैलांना यापासून इजा किंवा त्रास होईल असे वर्तन होत नाही हे ठणकावून सांगितले होते. शर्यत चालू करण्यासाठी ते शेवटपर्यत प्रयत्नशील राहिले. आमदार महेश लांडगे यांनी लोकसभा निवडणूक व मतदारसंघातील असंख्य शेतकर्‍यांच्या मतांवर डोळा ठेवत हा प्रश्न उचलून धरला. तसेच नंतर भाजपाचे सहयोगी सदस्य होऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी करून सत्तांतर घडवत भाजपाची सत्ता आणली. याचमुळे मुख्यमंत्री दरबारात त्यांचे राजकीय वजन वाढले. याचाच फायदा घेत त्यांनी बैलगाडा शर्यतीचा विषय लावून धरला आणि अधिवेशनात शर्यती सुरु करण्याचा मार्ग मोकळा करुन घेतला होता. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे श्रेय घेण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जात होती. भाजप सरकारकडून आमदार लांडगे यांना झुकते माप दिले जात होते. मात्र, ऐनवेळी उच्च न्यायालयाने वेसन घातल्याने लांडगे यांचे प्रयत्न पुन्हा निष्फळ ठरले.

स्टेप बाय स्टेप तंत्र
शिरुर लोकसभा मतदार संघातून सलग तीनवेळा लोकसभा निवडणुकीत बाजी मारणारे आढळराव यांचा राजकीय अनुभव दांडगा आहेे. तसेच हा प्रश्न केंद्राशी संबधीत असल्याने त्यांनी या प्रश्नासाठी स्टेपबाय स्टेप तंत्रांचा वापर करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पर्यावरण विभागाचे सचिव व सबंधीत अधिकारी यांना तामिळनाडूच्या धर्तीवरच महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीलाही परवानगी कशी मिळू शकते यासाठी आपल्या अनुभवाच्या पुरेपूर वापर करतर प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या तुलनेत लांडगे नवखे असल्याने या प्रश्ना बाबतच्या अनेक उणिवा दिसून आल्या. लांडगे यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग, रिंगरोड, रेड झोन, बैलगाडा शर्यत, कचर्‍यापासून विजनिर्मिती प्रकल्प, औद्योगिक प्रश्न आदी विकासकामांवरुन आढळराव यांना कायम शह देण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके’ असलेल्या आमदार लांडगे यांना राज्यातील सत्ताधारी भाजपने कामय झुकते माप दिले. तरिही खासदार लोकप्रियेत ’आढळच’ राहीले.

आढळरावांचे ‘मोदी कनेक्शन’
दरम्यान, लांडगे यांचा वारू रोखण्यासाठी आढळराव यांनी ‘हुकमी’ पत्ता बाहेर काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची जवळीक वाढली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांना हाताशी धरुन लांडगे आढळरावांविरोधात राजकीय ‘डाव’ करीत होते. स्थानिक विकासकामांचे श्रेय देण्यासाठी पालकमंत्री बापट आणि फडणवीस यांनी कायम लांडगे यांना प्राधान्य दिले. मात्र, थेट दिल्लीतून सूत्रे हलविण्यास आढळरावांनी सुरूवात केल्यामुळे लांडगे यांची अस्वस्थता वाढली आहे. विशेष म्हणजे, मोदी यांच्यासोबत आढळराव यांनी विदेशदौरा केल्याचेही बोलले जात आहे. ही जवळिक लांडगे यांची डोकेदुखी ठरणार आहे.

लांडगेंना पक्षांतर्गत विरोध?
सध्या शहरात सर्वच आघाड्यावर आमदार महेश लांडगे वरोधका बरोबरच पक्षांतर्गत नेत्यांनी देखील वरचढ ठरत आहेत. आता त्यांचे मिशन लोकसभा असल्याने लांडगे समर्थकांनी आढळराव यांना जाहीरपणे टीकेचे लक्ष्य केले. त्यामुळे खासदार आढळराव यांनी लांडगे यांना धडा शिकवण्यासाठी व्यव्हरचना आखली आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांना जिल्ह्यात आपल्यापेक्षा सरस नेतृत्व निर्माण होवू द्यायचे नाही. भेगडे यांना आगामी मंत्रीपदाचे दावेदार ठरायचे आहे. मात्र, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने भाजपमध्ये वजन वाढवले आहे. आमदार लांडगे ‘डोईजड’ होवू नयेत, यासाठी पालकमंत्री बापट, जिल्हाध्यक्ष भेगडे आणि शहराध्यक्ष जगताप आदी नेत्यांचा आमदार लांडगे यांना छुपा विरोध होण्याची शक्यता आहे. आणि हा विरोधच खासदार आढळराव पाटील यांच्या विजयाला हातभार लावेल. आमदार लांडगेंची प्रदेश पातळीवर वाढलेल्या ताकदीची खदखद पक्षांतर्गत विरोधातून व्यक्त होईल, असे जाणकारांचे निरीक्षण आहे.

आढळराव शिवसेनेचेच उमेदवार?
देशात आणि राज्यात जरी भाजपाचा प्रभाव वाढत चालला असला तरी ग्रामीण भागात आढळरावांची ताकद जैसे थे आहे. भाजपाची वाढलेली ताकद दिसत असली तरी ती ताकद राष्ट्रवादीची कमी होऊन मिळालेली ताकद आहे. या अगोदरही आढळराव यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वच राष्ट्रवादीचे आमदार असतानाही तीनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर मताधिक्याने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना मित्र पक्षांमध्ये सलोख्याचे वातावरण नसले, तरी महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकाही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता नाही. शिवसेनेला विद्यमान जागा तरी कायम राहतील. फक्त मित्र पक्षासाठी सोडलेल्या जागा भाजपाकडे राहतील. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ‘युती’ होणार असल्याने आढळरावच शिवसेनेचे उमेदवार राहतील आणि त्यामुळे त्यांचा विजय सोपा असेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे, आळंदी, खेड, जुन्नर आदी ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी भाजपचा बालेकिल्ला तयार केला. भोसरी आणि हडपसर विधानसभेत भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. भाजपची शिस्त पाहता, पक्षात कोणालाही झपाट्याने मोठी पदे मिळत नाहीत. मात्र, लांडगे यांची गती पाहता त्यांना पक्षातूनच विरोध होणार आहे. या राजकीय समीकरणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आढळराव सज्ज झाले आहेत. असे राजकीय जाणकारांचे मत आहे.