हिंदू जनजागरण समितीच्या सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले
भुसावळ- शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर रविवारी सायंकाळी हिंदू जनजागृती समितीच्या धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे प्रखर हिंदूत्वनिष्ठ तथा गोरक्षक आमदार टी.राजासिंह यांच्यासह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने गुन्हा
रविवारी शहरात होणार्या हिंदू जनजागृतीच्या सभेत धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, असे कुठलेही वक्तव्य करू नये, असे बाजारपेठ पोलिसांना आयोजकांना सभेची परवानगी देताना सीआरपीसी 149 ची नोटीस देऊन बजावले होते मात्र असे असताना सभेत वक्त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने गोरक्षक आमदार टी.राजासिंह यांच्यासह उमेश सुभाष जोशी (वांजोळा रोड, भुसावळ), प्रशांत हेमंत जुवेकर (जळगाव) व भूषण रेवा महाजन (गणेश कॉलनी, भुसावळ) यांच्याविरुद्ध बाजारपेठचे हवालदार छोटू माणिकराव वैद्य यांनी फिर्याद दिल्यावरून भादंवि 153 (अ), 295 (अ), 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत.