बील भरण्यास मुदत वाढवून न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 क ची नोटीस बजावून दि.26 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरावी अन्यथा गाळे सील करण्याचा नोटीसद्वारे प्रशासनाने इशारा दिल्यामुळे बी.जे.व्यापारी संकुलातील गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान,थकीत रक्कम भरण्यास मुदतवाढ द्यावी,4 पट दंड रद्द करावा,शास्ती माफ करावी या मागण्यांसाठी गाळेधारकांनी मंगळवारी आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले.थकीत रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला. मनपा प्रशासनातर्फे मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. आतापर्यंत महात्मा फुले,सेंन्ट्रल फुले,बी.जे.व्यापारी संकुलासह पाच व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावून दि.26 नोव्हेंबरपर्यंत थकीत रक्कम भरण्यासाठी प्रशासनाने अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्यासह अन्य मागण्यांसाठी मनपा गाळेधारक कोअर कमेटीच्या पदाधिकार्यांसह अन्य गाळेधारकांनी आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानी जावून तीव्र भावना व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले.
गाळेधारकांना विस्थापित करण्याचा प्रशासनाचा घाट
थकीत रक्कम 26 पर्यंत न भरल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाने नोटीसद्वारे इशारा दिला आहे. थकीत रक्कम भरण्यास गाळेधारक तयार आहेत,मात्र प्रशासनाने मुदतवाढ द्यावी,4 पट दंड रद्द करावा,शास्ती माफ करावी अशी मागणी मनपा गाळेधारक कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केली.गाळेधारकांकडे व्यवसायाचे दुसरे साधन नाही.ते परिवाराचा उदरनिर्वाह कसे करतील असा सवाल उपस्थित करत गाळेधारकांना विस्थापित करण्याचा प्रशासनाचा घाट असल्याचा आरोप डॉ.सोनवणे यांनी केला. उपायुक्त उत्कर्ष गुठ्ठे हे स्वत:ला मालक समजत असल्याची संतप्त भावना राजस कोतवाल यांनी व्यक्त केला.
मुदतवाढ देण्यास आयुक्तांचा नकार
मनपा गाळेधारक कोअर कमेटीच्या पदाधिकार्यांनी आमदार राजूमामा भोळे यांनी मुदत वाढवून देण्याची विनंती केल्यानंतर आ.भोळे यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला.मुदत मिळेल का?,काय मार्ग काढता येईल अशी विचारना केली असता आयुक्तांनी मुदतवाढीला नकार दिला.
सत्ता स्थापनेनंतर विधीमंडळात प्रश्न मांडणार- आ.भोळे
शासनाने राज्याभरातील मनपा,नपाच्या व्यापारी संकुलांसाठी दंडाची तरतूद केली आहे. दंड कमी करण्यासाठी किंवा दंड रद्द करण्यासंदर्भात विधिमंडळात प्रश्न मांडणे आवश्यक आहे.साज्यात सत्ता स्थापनेनंतर विधीमंडळात प्रश्न माडंणार असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.तसेच यासंदर्भात माजी मंत्री गिरिश महाजन यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ.भोळे यांनी गाळेधारकांना सांगितले.