पुणे – दहीहंडी उत्सवादरम्यान त्यांनी मुलींसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून आमदार राम कदम यांच्याविरोधात पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
दहीहंडीच्या दिवशी राम कदम यांनी तरुणांना आवाहन करत जर कुणाला मुलगी आवडत असेल, तिने नकार दिला असेल आणि तुमच्या आईवडिलांनी परवानगी दिली तर तुमच्यासाठी मी त्या मुलीला पळवून आणेल, असे खळबळजनक विधान केले होते. या विधानानंतर राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राज्यभरात त्यांच्याविरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. तर विविध पक्ष संघटनांच्यावतीने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे शहरातही मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकात राम कदम यांच्याविरोधात निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान राम कदम यांच्या फोटोला जोडे मारत, घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या लोकांना माज आला आहे. सातत्याने भाजपचे लोकप्रतिनिधी वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे राम कदम यांच्याविरोधात घाटकोपरमध्ये जाऊन महिला शक्ती काय असते हे दाखवून देऊ, असे मनसे महिला आघाडीच्या रूपाली पाटील यांनी म्हटले.