जनतेसह जनावरांची सोय होणार असल्याने समाधान
नवापूर: सध्या कोरोना महाविषाणुचे संकट मानवावर आले आहे. त्याच्यात तीव्र उन्हाने मनुष्य त्रस्त झाला आहे. म्हणून मानवाबरोबर प्राण्यांचेही पाण्यासाठी हाल होत आहे. रंगावलीसह तालुक्यातील लहान-मोठ्या नद्या सुकल्या आहेत. उन्हाचा पारा 40 वर पोहोचला आहे. उन्हामुळे नदी नाले कोरडे पडल्याने नवापूर तालुक्यातील लोकांना, जनावरांना व शेतीला पाण्याची टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागन मध्यम प्रकल्प अंतर्गत येणार्या लाभक्षेत्रात आवर्तन सोडण्यात आले.आ. शिरिषकुमार नाईक यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रानुसार नेसू नदीत पाणी सोडण्यात आले आहे. नागन मध्यम प्रकल्पातून पाणी सोडल्याने जनतेसह जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
नेसू नदीचे पात्र कोरडे पडल्याने किनार्यालगत असलेल्या ग्रामस्थांनी आ. शिरीषकुमार नाईक यांच्याकडे नागन प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना 21 एप्रिल रोजी पत्र दिले होते. नागन प्रकल्पाअंतर्गत येणार्या गावांना पाणी मिळावे भांगरपाडा, सोनारे, तारपाडा, भरडु, बीलबारा, देवलीपाडा, डोकारे, नवागाव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नागण प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती. नागन प्रकल्पातून पाणी नेसू नदीत सोडल्याने लोकांची व जनावरांना पाण्याची सोय होणार आहे. कालव्याचे काम अपूर्ण असल्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये पाणी सोडता येत नाही. परंतु मागणी केल्यानुसार शुक्रवारी नदीत पाणी सोडण्यात आले आहे.