यावल : आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून यावल नगरपरीषदेला विशेष अनुदान योजनेंतर्गत एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे व तसे पत्र नगरपरीषदेला प्राप्त झाले आहे.
आमदारांकडे लागल्या होत्या नजरा
दरम्यान, गत आठवड्यात यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर व फैजपूर नगरपरषदेच्या विकास कामांसाठी चार कोटी 92 लाखांचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण यावल शहरवासीयांच्या नजरा या आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे लागल्या होत्या. आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे अत्यंत म्हत्वाचे शहर आहे. या शहरातदेखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोणातून आमदार चौधरी यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी एक कोटी 20 लाखांचा भरीव निधी मंजूर केला असून तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगर परीषदेला पाठविले आहे. लवकरच शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात होणार आहे. या निधीमुळे यावल नगर परीषदेच्या विकासकामांना गती व दिशा मिळेल. हा निधी मंजूर करण्याकरीता माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या निधीस मान्यता मिळाली आहे. या निधीचा फायदा विकासकामांवर व्हावा , अशी अपेक्षा यावल शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. यावल शहरातील अनेक प्रश्न प्रलंबीत पडले असून यामुळे निधीमुळे ते मार्गी लागतील, अशी आशा यावलकर नागरीक व्यक्त करीत आहेत. नगरपरीषदेने चांगल्या दर्जाचे काम करणार्या ठेकेदारालाच ही नवीन काम द्यावीत, अशी अपेक्षा शहरवासीय करीत आहेत.