भुसावळ नगरपालिकेत निधी वर्ग होण्यापूर्वीच सत्ताधार्यांचा गाजावाजा ठरला चर्चेचा
भुसावळ:- शहरातील रस्त्यांचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण पद्धत्तीने नुतनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी विशेष पाठपुरावा केल्यानंतर 15 कोटींच्या निधीला मंजुरी झाली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील दहा कोटींचा निधी पालिकेत येण्यापूर्वीच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून माध्यमातून वारेमाप गाजावाजा करून घेतला मात्र प्रत्यक्षात माहिती घेतली असता जिल्ह्याच्या कोषागारातून हा निधी अद्याप पालिकेत वर्ग झाला नसल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. त्यातच भाजपाच्या सत्ताधारी गटाने निधी मिळाल्याच्या आनंदात मुख्यमंत्र्यांच्या मानलेल्या आभाराच्या जाहिरातीत ज्यांच्या प्रयत्नांनी हा निधी मिळाला त्या आमदारांचे नावच न टाकल्याने भाजपातील दुफळी समोर आली असून शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. भाजपात जुने निष्ठावंत व नवे हा वाद नवीन नाही त्यातच आमदारांनाच एक प्रकारे डावलण्यात आल्याने एका गटाला असलेली ‘अॅलर्जी’ आगामी काळात कुठल्या वळणावर पोहोचेल हे सांगणे कठीण आहे.
नेत्यांकडून स्तुतीसुमने मात्र पदाधिकार्यांना नावाची अॅलर्जी !
गेल्या दोन टर्मपासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांनी शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. पालिकेत विरोधी गटाची सत्ता असतानाही त्यांनी शहराचा विकास व्हावा हाच ध्यास ठेवून निधी आणला होता. भुसावळ पालिकेत भाजपाचीच एकहाती सत्ता यावी यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सावकारेंनी शक्ती पणाला लावली. दोघा नेत्यांच्या विश्वासालाच मतदारांनी सार्थ ठरवत पालिकेत भाजपाला सत्ता दिली मात्र तेच सत्ताधारी आता आमदारांना दूर लोटू पाहत असल्याने सावकारे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आमदार सावकारे यांनी ग्रामीण भागाचाही कायापालट केल्याने त्यांची शहर व तालुक्यावर घट्ट पकड आहे असे असताना आमदारांनाच डावलण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने ही भविष्यातील राजकारणाची नांदी तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित करण्यास वावदेखील आहे. भाजपाच्या एका गटातील काहींना सावकारेंचे प्रस्थ सुरुवातीपासूनच मान्य नाही त्यामुळे काही महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना करण्यास तर सुरुवात झाली नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यास वाव आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नेहमीच आमदार सावकारेंच्या कार्याबद्दल कौतुक केले आहे व तसे सार्वजनिक कार्यक्रमात जाहीररीत्या बोलूनदेखील दाखवले आहे शिवाय खडसे-सावकारेंमध्ये मतभेददेखील नाही मात्र काही पदाधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धत्तीने नेत्यांना फिडींग करीत असल्याची सावकारेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे.
ट्रीमिक्स रस्ते नेमके होणार कधी?
नगराध्यक्षांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार शहरातील नाहाटा महाविद्यालय, जामनेर रोड, सासतारा ब्रिज, हंबर्डीकर बेकरी, गांधी पुतळा ते यावल नाक्यापर्यंतचा भुसावळ शहरााच्या उत्तर व दक्षिण टोकांना जोडणारा प्रमुख मार्ग, लाईफ केअर हॉस्पीटल, जुना सातारा, टेक्नीकल हायस्कूल, गांधी पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग यासह अमरदीप टॉकीज रोड या शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गासह बाजारपेठ पोलीस ठाणे, बसस्थानक मार्ग, शिवाजी नगर, वरणगाव रोड ते हायवेपर्यंत या प्रमुख मार्गाचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण पद्धत्तीद्वारे नवनिर्माण केले जाणार आहे. दरम्यान, रस्त्यांचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण होणार असलेतरी ते नेमके केव्हा व कधीपासून सुरू होणार याबाबत निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. शहरासाठी केंद्र शासनाची अमृत योजना मंजूर असून दोन वर्षात ही योजना पूर्ण होणे गरजेचे आहे त्यासाठी अंडरग्राऊंड पाईप लाईन आधी करावी लागणार आहे त्यानंतर अंडरग्राऊंड गटारी, केबल्स कराव्या लागतील व त्यानंतरच ट्रीमिक्स रस्त्यांची कामे होणार आहे मात्र त्यापूर्वीच नगराध्यक्षांनी स्वतःच गुलाल उचलून कपाळाला लावण्याचा केलेला प्रकार हास्यास्पद असल्याची टिका शहरवासीयांमधून होत आहे.
पदाधिकार्यांची अवहेलना
नगराध्यक्ष रमण भोळे व पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभार मानलेल्या जाहिरातीत भाजपातील निष्ठावान असलेल्या पदाधिकार्यांना खालच्या रांगेत बसवले आहे शिवाय क्रायटेरीयाचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येते. स्वीकृत सदस्यांना प्रथम रांगेत पहिले स्थान असून त्यानंतर सभापतींचा क्रमांक आहे तर शिवसेनेचे एकमेव नगरसेवक असलेल्या मुकेश गुंजाळ यांना अखेरच्या लाईनीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे दीपनगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री दीपनगरात येत असताना शहरात वा महामार्गावर त्यांच्या स्वागताचे एकही बॅनर लावण्याची तसदी भाजपा पदाधिकार्यांनी घेतली नाही मात्र पालिकेला निधी मंजूर होताच त्यांचे आभार मानण्याचे सौजन्य त्यांनी दाखवल्याने हादेखील चर्चेचा विषय ठरला आहे.
आम्ही एकसंघच, आमदार आमचेच -भोळे
भाजपात कुठलाही गट-तट नसून आम्ही एकसंघच असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे यांनीदेखील शहराला निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला आहे मात्र काही लोक भाजपात गट पाडू पाहत असल्याचे ते म्हणाले.