आमदार साहेब झोपले आहेत !

जळगाव । घरावर संकट आलं तर आपल्याला एक सेकंदही झोप लागत नाही आणि इथे तर कोरोनामुळे जिल्ह्यातील समस्त जनता भयभीत झालेली असताना आमदार महोदय मात्र, सुखनैव झोपा झोडताहेत. हे आम्ही नाही, तर या आमदारांचे स्वीय सहाय्यकच सांगताहेत – आमदार साहेब झोपले आहेत !
जळगाव जिल्ह्यातील काही आमदार महोदय हे स्वतः कोरोनाच्या स्थितीविषयी, जनतेच्या समस्यांविषयी किती गंभीर आणि खंबीर आहेत याचा जनशक्तीला धक्कादायक अनुभव आला. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभर निर्बंध लागू केले आहे. या दरम्यान, समाजातील काही घटकांना पक्ष म्हणून मदत करण्यासाठी काय नियोजन केले आहे ? याची विचारणा करण्यासाठी ‘जनशक्ती’ प्रतिनिधीने जिल्ह्यातील एका आमदाराला मोबाईलवर संपर्क साधला. आमदार महोदयांच्या स्वीय सहाय्यकाने हा कॉल रिसिव्ह केला  आणि काय काम आहे, अशी विचारणा केली. फोन करणार्‍याने आपण जनशक्तीमधून बोलत असल्याचे सांगून लॉकडाऊनबाबत पक्षातर्फे लोकांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, असे विचारले. त्यावर ‘साहेब आता झोपले आहेत. उठले की, आम्ही तुम्हाला फोन करतो किंवा साडेचार वाजेपर्यंत कृपया आम्हाला फोन करावा’, असे उत्तर या स्वीय सहाय्यकाने दिले.